बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन येत्या दि. ९ डिसेंबर पासून सुरूवात होणार आहे. अधिवेशनाला विरोध करण्यासाठी पहिल्याचं दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महामेळावा आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भात गुरुवारी मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन निवेदन दिले.
याबाबत माजी आमदार मनोहर किणेकर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, २००६ पासून बेळगाव येथे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला जातो. कर्नाटक सरकारला बेळगावसह उत्तर कर्नाटकची खरोखरच काळजी असेल तर १९५६ पासून अधिवेशन का आयोजित केले नाही? असा सवाल त्यांनी केला. २००४ मध्ये बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेव्हापासून कर्नाटक सरकारने बेळगावात अधिवेशन घेण्यास सुरूवात केली. तेव्हा परवानगी मिळो अथवा न मिळो महामेळावा होईल, असे ते म्हणाले.
यावेळी माजी नगरसेवक रणजित चव्हाण पाटील, मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, तालुका म. ए. समितीचे सचिव एम. जी. पाटील, रामचंद्र मोदगेकर, विकास कलघटगी, मनोहर हुंदरे आदी उपस्थित होते.
0 Comments