खानापूर / प्रतिनिधी 

रामनगर - अळणावर मार्गावर कंटेनर झाडावर आदळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री ११.३० वाजता घडली. मोहम्मद निजाम (वय २८ रा.उत्तर प्रदेशातील मुरादाबाद) असे मृत चालकाचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी रात्री चालक मोहम्मद निजाम आपल्या ताब्यातील कंटेनर क्रमांक (केए २९ सी ३९८५) घेऊन रामनगरहून अलारवाडच्या दिशेने निघाला होता. दरम्यान तावरगट्टी फॉरेस्ट चेक पोस्टजवळ कंटेनर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकल्याने चालक मोहम्मद निजाम याचा जागीच मृत्यू झाला.  

कंटेनर अतिवेगाने आणि निष्काळजीपणाने चालविल्याने हा अपघात झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेची नोंद खानापूर पोलिस स्थानकात करण्यात आली असून पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईकडे यांनी पुढील तपास सुरू केला आहे.