• शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

खानापूर / प्रतिनिधी 

शिंपेवाडी (ता. खानापूर) येथे  बुधवारी, गुरुवारी रात्री हत्तींच्या कळपाने शेतवाडीत शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. सदर कळपात ४ मोठे आणि ३ लहान हत्ती होते. राजाराम परब, अनंत परब, विक्रम परब आणि विनायक परब अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे आहेत. या शेतकऱ्यांच्या ३ एकर शेतीमधील भात, ऊस आणि इतर पिके हत्तींनी उद्ध्वस्त केली. 

काबाड कष्ट करून घेतलेली पिके नष्ट होऊन आर्थिक फटका बसल्याने शेतकरी हताश झाले आहेत. याबाबत गावकऱ्यांनी सांगितले, हत्तींच्या उपद्रवामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळेस हत्तींचा शेतात आणि मानवी वस्तीनजीक वावर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना रात्र जागवावी लागत आहे. 

ग्रामस्थांनी वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे.  तरी हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वनविभागाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणीही केली जात आहे.