बेळगाव / प्रतिनिधी 

वक्फ भूसंपादनाविरोधात भारतीय जनता पक्ष राज्यभर लढा देत असून येत्या १ डिसेंबरला बेळगावात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत राज्यातील अनेक भाजप नेते सहभागी होणार आहेत.  

या आंदोलनात बसनागौडा पाटील-यत्नाळ, प्रताप सिंह, सी. एम. सिद्धेश, अरविंद लिंबावळी, कुमार बंगारप्पा, बी. पी. हरीश, एन.आर. संतोष यांच्यासह राज्यातील भाजपचे महत्त्वाचे नेते सहभागी होणार असल्याची माहिती आमदार रमेश जारकीहोळी यांनी दिली. या संदर्भात बेळगाव येथे आयोजित पूर्व नियोजित प्राथमिक बैठकीत ते बोलत होते. 

१ डिसेंबर रोजी होणाऱ्या वक्फ भूसंपादनाविरोधी व्यापक जनजागृती आंदोलनासाठी उपस्थित राहणाऱ्यांनी आपली वाहने येथील सरदार मैदानाव उभी करावीत व नजीकच्या गांधी भवन येथे उपस्थित राहावे, असे सांगताना हजारोंच्या संख्येने जमून हे आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन रमेश जारकीहोळी यांनी यावेळी केले. बेळगाव येथील गांधी भवन येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वक्फ भूसंपादनाविरोधातील हा आंदोलन कार्यक्रम होणार असल्याची माहितीही रमेश जारकीहोळी यांनी यावेळी  दिली. यावेळी भाजप युवा नेते किरण जाधव, मुरुगेंद्रगौडा पाटील यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते.