बेळगाव : मद्रास सॅपर्स अर्थात मद्रास इंजिनियरिंग ग्रुपच्या २४४ व्या स्थापना दिन आणि कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने मद्रास सॅपर्स तर्फे आयोजित केलेल्या ई - बाईक रॅलीचे बेळगावात आगमन झाले. त्यानिमित्त मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मद्रास इंजिनियरिंग ग्रुप हा लष्कराच्या जुन्या अभियांत्रिकी गटापैकी एक म्हणून ओळखला जातो.
कन्याकुमारी,तिरुवनंतपुम ,हैद्राबाद आणि बेळगाव या चार शहरातून ई - बाईक रॅली काढण्यात आली. इलेक्ट्रिक बाईक रॅली काढून पर्यावरण विधायक जनतेत जागृती निर्माण करण्यात आली. हातात तिरंगा आणि लष्कराचे ध्वज हातात घेतलेल्या रॅलीचे मराठा सेंटर येथे आगमन होताच टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. या रॅलीच्या निमित्ताने मद्रास इंजिनियरिंग ग्रुपच्या निवृत्त सैनिक आणि अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे स्नेहसंमेलन यावेळी झाले.
निवृत्त सैनिकांसाठी असणाऱ्या योजना, पेन्शन याची माहिती सेवानिवृत्त सैनिक आणि अधिकाऱ्यांना देण्यात आली त्यांच्या समस्यांचे निराकरण देखील रॅली समवेत आलेल्या पथकाने केले. या इलेक्ट्रिक बाईक रॅलीची सांगता शुक्रवार दि. २२ रोजी बंगलोर येथे होणार आहे.
0 Comments