बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव वड्डरवाडी येथील एक विवाहित महिला आणि तिच्या आईला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी तिघा आरोपींना बेळगाव द्वितीय जेएमएससी न्यायालयाच्या न्यायाधीश पंकजा कोननुर यांनी मंगळवारपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बेळगाव वड्डरवाडी गंगावाडी येथील आरोपी इंद्र अष्टेकर, हुवाप्पा अष्टेकर आणि मणिकंठ अष्टेकर यांनी विवाहित महिला व तिच्या आईला वेश्या व्यवसाय करत असल्याचा आरोप करून त्यांचे कपडे फाडून मारहाण केली होती. सदर आरोपींना माळमारूती पोलिसांनी अटक करून शनिवारी रात्री बेळगाव येथील न्यायाधीशांच्या निवासस्थानी आणले.

ॲड. सुमितकुमार अगसगी यांनी जामीन अर्ज दाखल करून आरोपीची बाजू मांडली. तिन्ही आरोपींना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर माळमारुती पोलिसांनी तिघांची हिंडलगा कारागृहात रवानगी केली.