बेळगाव / प्रतिनिधी
सीपीआयकडून छळ झाल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.
बेळगावच्या उद्यमबाग पोलीस स्थानकाचे सीपीआय (पोलीस निरीक्षक) धरमगौडा पाटील यांच्या विरोधात छळ केल्याचा आरोप करण्यात आला असून या कारणामुळे पाच पानी पत्र लिहून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचारी विठ्ठल मुन्नाळ यांना वाचवण्यात आले आहे.
सध्या उद्यमबाग पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या विठ्ठल यांनी आत्महत्येपूर्वी पाच पानी पत्र लिहिले असून, त्यामध्ये ड्युटी शिफ्ट बुकच्या प्रती, विविध आदेशपत्रे आणि इतर पुरावे समाविष्ट करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवले आहेत. विठ्ठल मुन्नाळ यांनी हे पत्र डीआयजी, बेळगाव शहर पोलीस आयुक्त, खडेबाजार एसीपी, गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्या कार्यालयासह मानवाधिकार आयोग, पोलीस तक्रार प्राधिकरण आणि अनुसूचित जाती- जमाती प्राधिकरण यांना पाठवले आहे.
पत्राची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ त्यांच्या घरी पोहोचून पोलीस कर्मचारी विठ्ठल मुन्नाळ यांना वाचवले असून सध्या त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे शिवाय त्यांचे समुपदेशन करण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
0 Comments