खानापूर / प्रतिनिधी 

बंदुकीची गोळी लागल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सोमवार (दि.११) मध्यरात्री ३ च्या सुमारास हलशी (ता. खानापूर) येथे घडली आहे. अल्ताफ मकानदार (वय ३५) असे मृत तरूणाचे नाव आहे. मृतदेह घटनास्थळावरून त्याच्या घराकडे नेण्यात आल्याने पोलिसांना संशय बळावला आहे. पोलिसांनी अल्ताफ सोबत गेलेल्या त्याच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन तपासणी सुरू केली आहे. गोळीबार नेमका कोणी आणि कशासाठी केला हे अद्याप समजलेले नाही. या घटनेनंतर  पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिसरात कडेकोट बंदोबस्त केला आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, अल्ताफ हा काल रात्री अन्य काही जणांसमवेत वाळू उपसा करण्यासाठी गेला होता. त्यावेळी अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात अल्ताफला गोळी लागली. अशी चर्चा सुरू आहे. या खून प्रकरणाने खानापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र मृतदेह घटनास्थळावरून त्याच्या घरी नेण्यात आल्याने पोलिसांना संशय बळावला आहे. पोलिसांनी उलट तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. श्वान पथक तसेच फॉरेन्सिक लॅबच्या तज्ञानाही घटनास्थळी पाचरण करण्यात आले आहे. अल्ताफ हा कुली काम करत होता, असे पोलिसांनी सांगितले.

घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख श्रुती, पोलीस उपाधीक्षक रवी नायक, नंदगडचे पोलीस निरीक्षक एस. सी. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करण्यासह चौकशी सुरू केली आहे. प्रथमदर्शी अल्ताफ याचा खून झाल्याचे बोलले जात आहे, मात्र तपासांती हे स्पष्ट होणार आहे.