उस्ते, सत्तरी गोवा : सुळगा (हिं.) येथील रहिवासी प्रेमळ व सेवाभावी स्वभावाचा माझा चांगला मित्र श्री. शट्टूप्पा (बाळू) पाटील (वय ४९) यांना दि. १८ ऑक्टोबर रोजी देवाज्ञा झाली. याचे आम्हास अतिव दुःख होत आहे. आज सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी त्याच्या अकरावा दिवस यानिमित्त त्याच्याविषयी थोडक्यात...
कुटुंबापलीकडे समाजात "मैत्री" हे प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचे नाते आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी आषाढ वारीच्या निमित्ताने संपर्कात आलेला आणि आता आमच्या कुटुंबातील सदस्य बनलेला शट्टूप्पा (बाळू) आम्हा सर्वांना अकस्मात सोडून गेला. त्याच्या अचानक जाण्यामुळे आम्हा सर्वांचा जिवलग मित्र हरपला आहे.
अनेक चढ-उतार सहन करून जीवनाला नाट्यमय कलाटणी देत 'वाल्याचा' 'वाल्मिकी' होत, स्वतःला सामाजिक कार्यात झोकून देत, त्याचा सुखाचा संसार सुरू होता. विठ्ठलाचा निस्सीम भक्त असल्याने, पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा हे तो सर्वांना अभिमानाने सांगत होता.
सेवाभावी वृत्ती, स्वभाव प्रेमळ व मनमिळावू असल्याने फक्त बेळगावच नव्हे तर नजीकचा चंदगड तालुका आणि गोवा येथेही त्याचा मोठा जनसंपर्क होता. 'शेंदूर बाळू' या नावाने तो परिचित होता.
- अन् त्याने वारीसाठी दिलेल्या शुभेच्छा अखेरच्या ठरल्या :
त्याचे सर्वांशी आपुलकीचे मैत्रीचे संबंध होते. यंदाच्या आषाढीवारी दरम्यान त्याने स्वतःच्या गावात कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आमचे स्वागत करून पाहुणचार केला.
मात्र यावेळी त्याने अतिशय भावूक होतं आमच्या वारीला पुढील वाटचालीसाठी दिलेल्या शुभेच्छा शेवटच्या ठरल्या...यापुढे आषाढवारीच्या निमित्ताने दरवर्षी सुळगा (हिं.) गावात येणे होईल, पण आमच्या स्वागतासाठी सदैव तत्पर राहणाऱ्या आमच्या मित्राची कायमची उणीवं जाणवेल आणि त्याच्या जाण्याने खोल मनावर झालेली जखम कायमची राहील.
प्रत्येकाच्या मदतीला धावणारा, गावातील कोणतेही सामाजिक किंवा कौटुंबिक कार्य हे स्वतःच्या घरातील कार्य समजून त्यात उत्साहाने भाग घेणाऱ्या माझ्या जिवलग मित्राला आता शोधावं तरी कुठे? त्याचा प्रेमळ व हसरा चेहरा अजूनही नजरेसमोर येतो. त्याचा सेवाभावी स्वभाव आम्हाला सतत प्रेरणा देणारा असाच होता.
आता सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील त्याची अधुरी राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे हीच त्याच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल.
शोकाकूल :
- श्री. पांडुरंग गावकर (वारकरी) तुझाच मित्र
संयोजक, श्रीराम माऊली वारकरी मंडळ उस्ते वाळपई, सत्तरी गोवा
0 Comments