बेळगाव : किणये (ता. बेळगाव) येथील विद्यमान ग्रा. पं. सदस्य श्री. हेमंतराव पुंडलिक पाटील यांना नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रीय आदर्श सरपंच सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हेमंतराव पाटील यांनी आपल्या एका वर्षाच्या कारकिर्दीत किणये ग्रामपंचायती अंतर्गत विविध विकासकामे राबवून गावची प्रगती साधली आहे. सामाजिक व शैक्षणिक, शासकीय व निमशासकीय क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय व अतुलनीय नि:स्वार्थी व शाश्वत सेवेची दखल घेऊन राष्ट्रीय पुरस्कार वितरण समिती, बेळगावी तर्फे दिल्ली, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातील निवडक व्यक्तींमध्ये हेमंत पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.हा पुरस्कार म्हणजे गेल्या तीस वर्षात त्यांनी केलेल्या कामाची पोच पावतीच आहे.यासर्व कामाची दखल घेऊन हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेमंत पाटील यांनी किणये ग्रामपंचायत व्याप्तीमध्ये येणाऱ्या गावांमध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली. या भागामध्ये विविध स्पर्धांना, खेळांना, मंदिरांना, युवक मंडळांना आपल्या परीने मदत केली. विविध सरकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्याचे विधायक काम त्यांनी केले आहे. गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, गेल्या दहा वर्षात ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष, बेळगाव जिल्हा रयत मोर्चा उपाध्यक्ष या पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. त्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्ष पदाची निवडणूक लढवून ते विजयी झाले. कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळेच ग्रामपंचायत अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते नावारूपाला आले.
या भागामध्ये अनेक संघ व संस्था स्थापन करून नावारूपाला आणल्या आहेत. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला सोसायटीची स्थापना करून महिलांना सक्षम बनविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. तसेच दहा वर्षांपूर्वी त्यांनी महालक्ष्मी कृषी पत्तीन सहकारी संघाची स्थापना केली असून सध्या ते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. याशिवाय गावामध्ये सरकारी डेअरीची स्थापना करून शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध करून दिला आहे. तसेच धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अनेक मंडळांना भजन साहित्याचे स्वखर्चाने वाटप, युवक मंडळांना जिमची व्यवस्था, स्त्रियांसाठी बचत गट, शाळेमध्ये मुलांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले आहेत.
0 Comments