- सुळगा (उ.) येथे शोकसभेत कै.शट्टूप्पा (बाळू) पाटील यांना श्रद्धांजली
सुळगा (उ.) / वार्ताहर
समाजसेवेचा ध्यास अन् अध्यात्माची आस असलेल्या शट्टूप्पा (बाळूने) शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा केली. सेवाभावी वृत्तीमुळेच तो आम्हा सर्वांच्या कुटुंबातील सदस्य बनला होता. मात्र एका शुल्लक व्यसनामुळे जडलेल्या दुर्धर आजाराने त्याला कायमचे आपल्यापासून हिरावून नेले. तेव्हा समाजसेवा करा, व्यसन टाळा हीच बाळूला खरी श्रद्धांजली ठरेल असे आवाहन शिरूर मठाचे सद्गुरु कोंडीबा महाराज यांनी केले. शनिवार (दि. २६) ऑक्टोबर रोजी सुळगा (उ.) येथे कै.शट्टूप्पा (बाळू) पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित शोकसभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मण्णूर येथील दि. मार्कंडेय को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे चेअरमन श्री. प्रसाद चौगुले, सुळगा (उ.) येथील प्रतिष्ठित नागरिक तथा उद्योजक श्री. भाऊराव गडकरी, सामाजिक कार्यकर्त्या सौ. माधुरी जाधव पाटील, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. शिवाजी जाधव, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. तुकाराम उघाडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सद्गुरु कोंडीबा महाराज पुढे म्हणाले, बाळूच्या आकस्मिक निधनामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यातून सावरण्यासाठी त्यांना बळ मिळावे अशी प्रार्थना त्यांनी परमेश्वराकडे केली. याशिवाय कै. शट्टूप्पा (बाळू) यांच्या सुपुत्रास वडिलांच्या सामाजिक कार्याचा वसा निरंतर सुरू ठेवण्याची सूचना त्यांनी केली.
प्रारंभी सद्गुरू कोंडीबा महाराज यांच्याहस्ते कै. शट्टूप्पा (बाळू) पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या सौ. माधुरी जाधव पाटील, यांनी अत्यंत भावनिक शब्दात कै. शट्टूप्पा (बाळू) यांना श्रद्धांजली वाहिली. कोरोनाच्या बिकट काळात रुग्णांची सेवा करताना बाळू दादाशी आपला परिचय झाला. पुढे सर्व सुख - दुःखात तसेच बिकट प्रसंगी मोठ्या भावाप्रमाणे तो खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिला. समाजसेवा हेच ध्येय असल्यामुळे दादा आणि माझे बहीण - भावाचे नाते दृढ झाले. त्याच्या अवेळी जाण्यामुळे माझ्या पाठीवरील भावाचे छत्र हरपले अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच यापुढे बहीण म्हणून भावाच्या कुटुंबाला आधार देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या डोळ्यातील अश्रूंमुळे कै. शट्टूप्पा (बाळू) यांच्याशी असलेले त्यांचे नाते हे रक्ताच्या नात्यापलिकडचे होते याची प्रचिती आली.
यानंतर कै. शट्टूप्पा (बाळू) यांना श्रद्धांजली वाहताना दि. मार्कंडेय को. ऑप. क्रेडिट सोसायटी, मण्णूरचे चेअरमन श्री. प्रसाद चौगुले म्हणाले, गरीबी काय असते हे अगदी जवळून पाहिलेला माणूस म्हणजे बाळू पाटील. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले. मात्र कर्तुत्वाच्या जोरावर फक्त बेळगाव तालुकाच नव्हे तर खानापूर आणि नजीकच्या महाराष्ट्रातील चंदगड तालुका आणि अलीकडेच अथणी तालुक्यातही आपल्या नावाचा ठसा त्यांनी उमटवला होता. त्यांचे सर्वांशी आपुलकीचे मैत्रीचे संबंध होते. अंत्यसंस्कारावेळी लोटलेला जनसमुदाय पाहून याची प्रचिती आली. सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देत वेळोवेळी त्यांनी सर्वांची मदत केली आहे. तेव्हा सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाने शक्य तेवढी आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबाला हातभार लावावा अशी असे आवाहन त्यांनी केले.
तर सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री.शिवाजी जाधव यांनी कै. शट्टूप्पा (बाळू) पाटील यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला. एकेकाळी कपाळावरील शेंदूर ही शट्टूप्पा (बाळू) याची ओळख होती. मात्र त्यानंतर शिरूरच्या सद्गुरू कोंडीबा महाराजांचा सहवास लाभल्याने त्याच्या आयुष्याचा कायापालट झाला, पुढे सामाजिक कार्यामुळे स्वतःची ओळख निर्माण केलेल्या बाळूने सुळगा गावचा नावलौकिक वाढवला. भावीपिढीने हा आदर्श घेऊन काम करावे तसेच व्यसनापासून दूर राहावे अशी कळकळीची विनंती त्यांनी केली.
याप्रसंगी श्रद्धांजली वाहताना उद्योजक भाऊराव गडकरी म्हणाले, देवाच्या दरबारात चांगल्या माणसांची कमी आहे. त्यामुळे अशा व्यक्तींची सेवा करण्याची संधी मिळावी म्हणूनच वाल्याचा 'वाल्मिकी' झालेल्या बाळूने अवेळी जगाचा निरोप घेतला अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ग्रा. पं. सदस्य असताना बाळूने कधीच स्वार्थाचे राजकारण केले नाही. अगदी पतसंस्थांचे कर्ज काढून गावचा विकास करण्यात तो मागे राहिला नाही. मरावे परी कीर्ती रुपे उरावे असे कार्य केल्यामुळे देह रुपाने तो आपल्यात नसला, तरी आजही तो अमर आहे याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
प्रास्ताविकात सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. तुकाराम उघाडे यांनी बाळू यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. तसेच शोकसभेला शिरूरच्या कोंडीबा महाराजांची उपस्थिती लाभली, हे आम्हा सर्वांचे भाग्य असल्याचे ते म्हणाले. या शोकसभेत उपस्थित इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत कै. शट्टूप्पा (बाळू) पाटील यांना श्रद्धांजली वाहिली.
सभेचे सूत्रसंचालन शेखर मनोहर पाटील, विक्रम (हरी) जाधव यांनी केले. यावेळी स्थानिक ग्रामस्थ यांच्यासह कै. शट्टूप्पा (बाळू) यांचे हितचिंतक, गावातील महिला - पुरुष, युवक - युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments