- कॅम्प परिसरात मुस्लिम बांधवांकडून दौडचे स्वागत
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावात आज श्री दुर्गा मातादौडचा दुसरा दिवस श्री ब्रह्मचारिणीच्या पूजेने साजरा करण्यात आला. देव, देश आणि धर्मजागृतीचा संदेश देण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दरवर्षी बेळगावात श्री दुर्गा मातादौड आयोजित केली जाते. आज श्री दुर्गामाता दौडच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात शहरातील काँग्रेस रोडवरील श्री शिवतीर्थ येथून श्री ब्रह्मचारिणीच्या पूजेने झाली. तत्पूर्वी ध्वज चढविण्यात आला. त्यानंतर प्रेरणामंत्र, गणेश, दुर्गामाता आणि छ.शिवाजी महाराजांची आरती करून दुसऱ्या दिवशीच्या दौडला चालना देण्यात आली.
दौडच्या स्वागतासाठी प्रत्येक गल्लीत आकर्षक सजावट आणि फुलांची आरास करण्यात आली होती. दौडमध्ये धारकऱ्यांनी दिलेल्या जय भवानी, जय शिवाजी अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सुहासिनींनी आरती करून दौडचे स्वागत केले.
छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष म्हणजे साऱ्यांसाठीचं वंदनीय आणि दुर्गामाता ही स्फूर्ती व ऊर्जा देणारी देवता त्यांच्या नावे काढल्या जाणाऱ्या दौडीचे स्वरूप बेळगावात सामाजिक सलोखा आणि समरसता पसरविणारी दौड असे झाले आहे. शुक्रवारी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख यांच्यासह मुस्लिम बांधवांनी कॅम्प परिसरात दौडचे स्वागत केले. तसेच दौडमध्ये सहभागी झालेल्या धारकऱ्यांना केळी, पाणी आणि अल्पोपहाराचे वाटप केले.
भगवा फेटा, पांढऱ्या वेशभूषेतील आबालवृद्ध मोठ्या संख्येने दौडमध्ये सहभागी झाले होते. ग्लोब टॉकीज रोड, इंडिपेंडन्स रोड, हाय स्ट्रीट, चर्च स्ट्रीट, कल्याणी स्वीट मार्ट रोड, गवळी गल्ली, मद्रास स्ट्रीट, कुंती माता मंदिर, फिश मार्केट, तेलगु कॉलनी खानापूर रोडमार्गे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज सर्कल जवळील श्री शंभू जत्तीमठ दुर्गामाता मंदिर येथे ध्येयमंत्र म्हणून ध्वज उतरविण्यात आला. यानंतर दौडची सांगता झाली.
- दौड उद्याचा मार्ग :
शनिवारी राणी चन्नम्मा सर्कल येथील श्री गणेश मंदिरापासून श्री दुर्गामाता दौडच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात होणार आहे. यानंतर काकतीवेस रोड, खडक गल्ली, कोर्ट, चव्हाट गल्ली, पी.बी.रोड, आरटीओ सर्कल, छ. शिवाजी नगर, फोर्ट रोड, गांधीनगर या मार्गाने किल्ला श्री दुर्गादेवी मंदिरात येऊन दौडची सांगता होणार आहे.
0 Comments