बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहांचे हिवाळी विशेष अधिवेशन 9 ते 20 डिसेंबर दरम्यान बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे घेण्याचे नियोजित आहे, मात्र अद्याप तारीख निश्चित झालेली नाही. अधिवेशनाबाबत सरकार मंत्रिमंडळात निर्णय घेणार आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाची तयारी सुरू करण्यात आली असून अधिका-यांना अधिवेशन सुव्यवस्थितपणे चालविण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांनी सांगितले.
शुक्रवारी बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सर्वसमावेशक कर्नाटक चर्चेसोबतच उत्तर कर्नाटकच्या समस्या निदर्शनास आणून द्याव्यात. या संदर्भात सदर भागाच्या समस्येवर चर्चा करण्याची अधिक संधी उपलब्ध करून दिली जाईल. या भागातील आमदार आणि मंत्र्यांनी अधिवेशनात सहभागी होऊन आपल्या मतदारसंघातील समस्यांबाबत चर्चा करावी, असे ते म्हणाले. हिवाळी अधिवेशन पाहण्यासाठी येणाऱ्या शाळकरी मुलांसाठी आणि दूरच्या शहरातून येणाऱ्या लोकांसाठी न्याहारी कॅन्टीनची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशन ९ डिसेंबरपासून होऊ शकते, असे विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी यांनी सांगितले. या संदर्भात तयारी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर कर्नाटकातील आमदार आणि मंत्र्यांनी या भागाच्या समस्येवर चर्चा करावी. म्हैसूर कर्नाटकचे आमदार आणि मंत्र्यांनी गेल्या अधिवेशनात मोठ्या प्रमाणात चर्चा केली होती, असे ते म्हणाले. बेळगाव सुवर्ण विधानसौधच्या आवारात आमदार निवास बांधण्यावर चर्चा झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार आसिफ सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद,पोलिस उपायुक्त जगदीश रोहन आदी उपस्थित होते.
0 Comments