बेळगाव : येथील सांबरा विमानतळाला धमकीचा ई मेल आल्याने खळबळ माजली होती. विमानतळ प्रशासनाने पोलिसांना याची माहिती देताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी विमानतळावर दाखल झाले. 

पोलिसांनी श्वानपथक तसेच बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीने संपूर्ण विमानतळाची तपासणी केली. या तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. पोलिसांनी विमानतळाच्या बाहेरील परिसराची देखील तपासणी केली.

पण काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याने विमानतळ प्रशासनाने आणि पोलीस खात्याने सुटकेचा निःश्वास सोडला. याप्रकरणी मारीहाळ पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे. ई - मेल पाठवणाऱ्याचा आता पोलीस खाते शोध घेत आहे.