- डॉ. गणपत पाटील ; संस्थापक जीवन संघर्ष प्रतिष्ठान
बेळगाव : सुळगा (उ.) गावातील सामाजिक कार्यकर्ता आणि विद्यमान ग्रा. पं. सदस्य शट्टूप्पा (शेंदूर बाळू) यांचे शुक्रवार (दि.१८) ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ही दुःखद बातमी समजतांच सुळगा (उ.) गावचे सुपुत्र आणि सध्या व्यवसायानिमित्त न्यूझीलंड येथे वास्तव्यास असलेले (शेंदूर बाळू) यांचे जिवलग मित्र आणि जीवन संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. गणपत पाटील यांनी आपल्या शोक संदेशातून शट्टूप्पा (शेंदूर बाळू) यांच्या भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला आहे.
- वाल्याचा वाल्मिकी :
माझा मित्र शट्टूप्पा (शेंदूर बाळू) यास अखेरचा निरोप देताना मला त्याचा भूतकाळ आठवला ज्याच्या आधारे मी त्याला वाल्याचा वाल्मिकी म्हणू इच्छितो. हा एक योगयोग म्हणावा लागेल, कारण वाल्मिकी जयंतीच्या आठवड्यात अल्पशा आजाराणे अचानक त्याचे निधन झाले.
एकेकाळी लोक त्याच्या कपाळावरचा टिळा (शेंदूर) बघून त्याला ओळखायचे. बेळगाव ते शिनोळी- नागनवाडी - चंदगड - खानापूर- गोवा भागात ख्याती असलेला व राजकीय लोक, हिंदू संघटना, आदरणीय ग्रामस्थ, पोलीस विभाग यांच्या तो कायम संपर्कात होता.
सुमारे ३० वर्षांपूर्वी, तो हिंदू संघटनेसाठी काम करत होता. त्यावेळी तो गुंडांच्या संपर्कात आला. त्यावेळी बेळगावमध्ये हिंदू - मुस्लिम यांच्यात खूप संघर्ष व्हायचा. विशेषत: दरवर्षी गणेश चतुर्थीच्यावेळी हे तरुण त्यांच्याविरुद्ध लढत असत. त्यावेळी कुविख्यात ; सुपारी किलरकडून त्यांच्या म्होरक्याचा खून झाला. त्यावेळी तो वर्षभर तुरुंगातही होता.
- ती परिवर्तनाची वेळ :
त्यानंतर काही का असेना बाळूने आपला संसार थाटला. त्यlला आपल्या कर्माची जाणिव झाली. तेव्हापासून त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. स्वत:ला समाज कार्यात झोकून दिले. गावा गल्लीमधे कोणी आजारी असो वा अडचणीत असो तो कायम मदत करत असे. रात्री अपरात्री कोणीही बोलावले असता लगेच उठून जात असे.
- राजकरण :
निवडणुकीच्यावेळी अहोरात्र प्रचार, सुरुवातीचे काळात समिती व आता राष्ट्रीय पक्षकार्यात तो सक्रिय होता. त्याचबरोबर हिंदू संघटना, श्रीराम सेना, बजरंग दल असो एक कार्यकर्ता म्हणून तो कायम उपस्थित राहायचा.
- कोविड योद्धा : कोविड महामारीच्या काळात अनेकांना घरोघरी मदत
कोविड महामारीच्या काळात त्याने अन्न आणि भाजीपाला पुरवठा, जीवन संघर्ष फाउंडेशन रुग्णवाहिका सेवा, ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मध्ये त्याने अनेकांना घरोघरी मदत केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मध्ये (Isolation centre) एक स्वयंसेवक म्हणून काम केले.
ग्रामपंचायत सदस्य म्हणून सुळगे (उ.) गावचा विकास, स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा, रस्त्यांचे काम, गटारी आणि स्वच्छता या सर्व कामात कोणताही भेदभाव केला नाही. आध्यात्माची आवड - गावमधील वारकरी संप्रदायाचे कार्य असो वा मंदिराचे काम अगदी भक्तिभावाने तो कार्यात सहभागी व्हायचा.
असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व होणे नाही. लिहावे तेवढे कमीच. त्याला शेवटचा निरोप देताना खूप वाईट वाटते. मरावे परी कीर्ती रूपी उरावे। वरील वर्णन केलेल्या कार्यमधून त्याने वाल्याचा वाल्मिकी होऊन स्वत: ला सिद्ध करुन दाखविले !
जीवन संघर्ष प्रतिष्ठानकडून स्व. बाळू पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
शब्दांकन - डॉ.गणपत पाटील
संस्थापक जीवन संघर्ष प्रतिष्ठान
0 Comments