सुळगा (हिं.) : येथील विद्यमान ग्रा. पं. सदस्य आणि सामाजिक कार्यातून जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटणारा सामाजिक कार्यकर्ता श्री. शट्टूप्पा (शेंदूर बाळू) पाटील यांच्या पार्थिवावर शनिवार (दि. १९) ऑक्टोबर रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.शुक्रवार (दि. १८) ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले होते.
प्रारंभी शनिवारी सकाळी मारुती गल्ली सुळगा (हिं.) येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी शिरूर मठाच्या स्वामींसह अनेक मान्यवरांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन बाळू यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यानंतर सकाळी ठीक १० वाजता निवासस्थानापासून ट्रॅक्टर मधून पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. वेंगुर्ला रोड, मारुती गल्ली, लक्ष्मी गल्ली मार्गे फिरून पुन्हा वेंगुर्ला रोडवरून पार्थिवाची मिरवणूक स्मशानभूमीत दाखल झाली.
तत्पूर्वी शनिवारी सकाळी ग्रामस्थांनी स्मशानभूमीला फुलांची सजावट आणि गावात ठिकठिकाणी रांगोळ्या काढून अंत्ययात्रेची तयारी केली होती. गावातील मुख्य गल्ल्या आणि मार्ग तसेच स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर शट्टूप्पा (बाळू) यांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर लावण्यात आले होते.
दरम्यान अंत्यसंस्कारासाठी उपस्थित मान्यवरांनी शट्टूप्पा (बाळू) यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत, त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी शिरूर मठाच्या स्वामींसह उपस्थित असलेले श्री. अष्टेकर दादा यांनी शट्टूप्पा (बाळू) यांच्या अध्यात्मिक क्षेत्रातील कार्याची माहिती देताना स्वामी आणि बाळू या गुरू शिष्याच्या नात्यातील आठवणींना उजाळा दिला. तसेच बाळू यांच्या अंत्यसंस्कारासाठी लोटलेला जनसमुदाय पाहता अवघे पंढरपूरचं येथे दाखल झाल्यासारखे वाटत असल्याचे ते म्हणाले.
बेळगाव ग्रामीण भाजपचे नेते तथा सातारा जिल्हा निवडणूक प्रभारी धनंजय जाधव श्रद्धांजली व्यक्त करताना म्हणाले, शट्टूप्पा (बाळू) यांच्या निधनामुळे त्यांचे कुटुंब आणि भारतीय जनता पार्टीसह सर्व कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत जीवावर उदार होऊन बाळू यांनी केलेल्या कार्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. यावेळी समाजसेवेचे कार्य अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी बाळू सारख्या कार्यकर्त्याचा पुनर्जन्म व्हावा, अशी ईश्वरचरणी प्रार्थना त्यांनी केली.
तर बेळगावचे माजी महापौर तथा सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांनी बाळू यांच्या सामाजिक कार्याबद्दल माहिती दिली. गावाच्या बरोबरीने बेळगाव शहरामधून कोणीही मदतीचे आवाहन केले तर तो धावून जायचा. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याने जनतेची सेवा केली. तो फक्त सुळगा गावाचा नव्हे तर बेळगाव शहराचाही सुपुत्र होता. त्याचे निधन खरोखरचं मनाला वेदना देणारे आहे. त्याच्या मृतात्म्यास चिरशांती लाभू दे, अशी प्रार्थना त्यांनी परमेश्वराकडे केली.
सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव यांनीही शट्टूप्पा (बाळू) यांना श्रद्धांजली वाहिली. जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा, कोणत्याही संकटात माता, बंधू - भगिनींना खंबीर साथ देणाऱ्या माझ्या भावाने अवेळी जगाचा निरोप घेतला, अशी खंत व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले, हे पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.
याप्रसंगी बेळगाव ग्रामीण भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विनय कदम, सुळगा गावातील उद्योजक आणि प्रतिष्ठित नागरिक भाऊराव गडकरी, कल्लेहोळचे ग्रा. पं. सदस्य अनिल पाटील आणि अजित कलखांबकर यांनीही शट्टूप्पा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. मरावे परी कीर्ती रूपे उरावे, असेचं बाळूचे कार्य होते. त्यामुळे आज तो देह रूपाने आमच्यात नसला तरी कार्यातून सदैव आमच्या सोबतचं असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी सुळगा ग्रा. पं. अध्यक्ष - उपाध्यक्ष आणि सदस्य, सुळगा ग्रामस्थ, पंचक्रोशीतील विविध ग्रा. पं. चे पदाधिकारी आणि सदस्य, शैक्षणिक, सामाजिक - सेवाभावी संघटना, पतसंस्था , महिला मंडळे, भजनी मंडळे, राजकीय व्यक्तींनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यानंतर शट्टूप्पा (बाळू) यांच्या पार्थिवावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.
तळागाळातील जनतेच्या समस्या, अडीअडचणी जाणून घेत संकटकाळी कोणतीही तमा न बाळगता सर्वांच्या हाकेला प्रतिसाद देत मदतीला धावून जाणारे शट्टूप्पा (बाळू) हे गावच्या प्रत्येक घरातील कुटुंबाचे सदस्य बनले होते. फक्त बेळगावच नव्हे तर नजीकचा चंदगड तालुका आणि गोव्यातही त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. शनिवारी अंत्यसंस्कारासाठी जमलेला जनसमुदाय पाहता याची प्रचिती आली.
या दुःखद घटनेमुळे शट्टूप्पा (बाळू) यांच्या कुटुंबासह सुळगा गावावर शोककळा पसरली आहे.
0 Comments