• खानापूर तालुक्याच्या कसबा नंदगड येथील घटना 

खानापूर / प्रतिनिधी 

कसबा नंदगड येथील व्हन्नव्वा देवी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू  झाला. सोमवारी, २१ ऑक्टोबर रोजी ही दुर्दैवी घटना घडली. गिरीश बसवराज तळवार (वय १४, रा. रागर्भेनहट्टी ता. खानापूर) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. 

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, गिरीश सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या व्हन्नव्वा देवी मंदिराजवळील तलावात पोहण्यासाठी गेला होता. तलाव पावसामुळे पाण्याने पूर्ण भरलेला असल्याने, त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि पोहता न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. गिरीश पाण्यात बुडाल्याचे पाहून त्याच्या मित्रांनी तातडीने तेथून जाणाऱ्या लोकांना कळवले. घटनेची बातमी परिसरात समजताच, नंदगड परिसरातील अनेक लोक तलावाजवळ जमले. अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी ५.३० वाजता गिरीशचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. या घटनेची नोंद नंदगड पोलिस स्थानकात  करण्यात आली आहे.