बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावच्या नूतन महापालिका आयुक्त श्रीमती शुभा बी. यांनी आज मंगळवारी पदभार स्वीकारला. बेळगाव शहराच्या विकासासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
बेळगाव महापालिकेचे विद्यमान आयुक्त अशोक दुडगुंटी यांची बदली झाल्यानंतर आज नूतन आयुक्त म्हणून शुभा बी. रूजू झाल्या. दरम्यान मावळते महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी त्यांच्याकडे अधिकार सुपूर्द केले. यावेळी उपायुक्त रेश्मा तालिकोटी, उदयकुमार, अभियंता लक्ष्मी निपाणीकर व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नूतन आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच मावळते आयुक्त अशोक दुडगुंटी यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी नूतन आयुक्त श्रीमती शुभा बी. यांनी महापौर, आमदार, नगरसेवकांना विश्वासात घेऊन कर्तव्य बजावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. बेळगाव शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे कन्नड ही अधिकृत भाषा म्हणून वापरली जावी. सरकारी कर्मचाऱ्यांनी कन्नड ध्वज चिन्ह असलेले ओळखपत्र परिधान करावे. शहरातील दुकानदारांनी फलकावर ६० टक्के कन्नड आणि ४० टक्के इतर भाषा वापरणे बंधनकारक आहे. व्यावसायिकांना विश्वासात घेऊन हे काम यशस्वी केले जाईल, असे त्या म्हणाल्या..
आता कर संकलन शहरी विकासाला पूरक आहे. पायाभूत सुविधा देण्यासाठी कराचा पैसा आवश्यक आहे. कराची थकबाकी १९७६ च्या नियमांनुसार भरली जाईल. या कामसाठी विशेष पथक तयार करण्यात येणार आहे. सुवर्णसौध, बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी आवश्यक वाहने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.दक्षिण कर्नाटकातील लोकांना उत्तर कर्नाटकात येऊन सेवा देण्यासाठी अनुकूल वातावरण असून सर्वांनी सहकार्य करावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बेळगाव महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments