- कारमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
चिक्कोडी / वार्ताहर
जैनापूर (ता. चिक्कोडी) गावाजवळ एक प्रसिद्ध व्यावसायिक तथा काँग्रेस नेत्याचा कारला आग लागल्याने जळून मृत्यू झाल्याची घटना घडली. फैरोज बडगावी (वय ४० रा.मुल्ला प्लॉट) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे.
जैनापूर गावाच्या हद्दीत संकेश्वर - जेवर्गी राज्य महामार्गाजवळ मंगळवारी रात्री उशिरा एका कारला आग लागली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून या घटनेत चालकाच्या सीटवर बसलेला ग्रॅनाईट व्यावसायिक फैरोज पूर्णपणे जळून खाक झाल्याचे आढळून आले.
मृत फैरोज काँग्रेस पक्षात कार्यरत होता. त्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या लढतीची तयारीही केल्याची माहिती आहे. दरम्यान व्यावसायिकाच्या मृत्यूबाबत कुटुंबियांनी संशय व्यक्त केल्याने चिक्कोडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिक्कोडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता ही आग लागल्याचे आढळून आले. मात्र त्याच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
0 Comments