बेळगाव / प्रतिनिधी
स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणाऱ्या कॉम्रेड कृष्णा मेणसे यांनी त्यानंतर गोवा मुक्ती संग्राम असो किंवा बेळगावच्या मराठी माणसासाठी जी चळवळ सुरू ठेवली ती अत्यंत महत्त्वाची आहे. सामाजिक दृष्टिकोनातून बंधुभाव वाढवण्याचा प्रयत्न आजही आवश्यक आहे हे आपल्याला कॉ. मेणसे यांच्या माध्यमातून लक्षात येऊ शकते, असे विचार कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले.
सदर पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरुवात महात्मा गांधींची प्रसिद्ध प्रार्थना व स्वागत गीताने झाली. प्रा. सुनील शिंत्रे यांनी स्वागत, प्रास्ताविक प्राचार्य कल्याणराव पुजारी यांनी, तर मानपत्राचे वाचन प्रा. सुभाष कोरे यांनी केले. त्यानंतर खासदार छ. शाहू महाराज आणि ॲड. राजाभाऊ पाटील यांच्या हस्ते कॉ. कृष्णा मेणसे यांना महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार व मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी मध्यवर्तीय म. ए. समितीच्यावतीने कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर व प्रकाश मरगाळे यांच्यासह विविध संघ संस्थांतर्फे हस्ते कॉ. मेणसे व खासदार छत्रपती शाहू महाराज यांचा सत्कार करण्यात आला. महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून कॉ. कृष्णा मेणसे यांनी यावेळी समायोचित मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. अखेर अध्यक्षीय भाषणानंतर उद्योजक सुभाष ओऊळकर यांच्या आभार प्रदर्शनाने सोहळ्याची सांगता झाली. सोहळ्यास महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक निमंत्रित आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. सोहळ्याचे सूत्रसंचालन अश्विनी पाटील यांनी केले.
0 Comments