- बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय
बेळगाव / प्रतिनिधी
मराठी सीमाभाग अन्यायाने १ नोव्हेंबर १९५६ रोजी तात्कालीन म्हैसूर व आताच्या कर्नाटक राज्यात डांबण्यात आल्यामुळे गेल्या ६७ वर्षापासून काळा दिन सुतक दिन म्हणून पाळला जातो. येत्या एक नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काळ्या दिनाची विभागवार जनजागृती करावी असा निर्णय बेळगाव तालुका म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर होते. प्रारंभी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची चिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी प्रास्ताविक करून महाराष्ट्र एकीकरण समितीचे दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहिली.
1 नोव्हेंबर काळा दिन मूक मोर्चामध्ये कार्यकर्ते आणि मराठी भाषिक आणि बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन करणारा ठराव संमत करण्यात आला. याखेरीज चर्चेअंती काळादिन जनजागृतीसाठी आठ विभाग करण्यात येऊन त्या विभागांची जबाबदारी ठराविक पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आली. त्यानुसार उचगाव विभागाची जबाबदारी आर. एम. चौगुले, दीपक पावशे व चेतन पाटील, बेळगुंदी विभागासाठी संतोष मंडलिक, डी. बी. पाटील, राजू किणेकर व डी. एस. पाटील, किणये विभागासाठी आर. के. पाटील, अनिल पाटील व मोनाप्पा पाटील, हालगा विभागासाठी मनोहर संताजी व विठ्ठल पाटील, सांबरा विभागासाठी रामचंद्र मोदगेकर व मनोहर संताजी, काकती विभागासाठी लक्ष्मण पाटील, तर कडोली विभागात जनजागृती मोहीम राबविण्याची जबाबदारी मनोहर हुंदरे व शिवाजी कुट्रे यांच्यावर सोपवण्यात आली.
यावेळी बोलताना मनोहर किणेकर म्हणाले, 1956 ला भाषावार प्रांतरचना करण्यात आली. त्यावेळी अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. त्यामुळे 1956 पासून केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही काळादिन गांभीर्याने पाळतो. तो आम्ही 1 नोव्हेंबरलाही पाळणार आहोत, त्यातून मागे हटणार नाही. त्यासाठी विभागवार बैठका घेवून जागृती करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
बैठकीत युवा नेते आर. एम. चौगुले, मनोहर संताजी, संतोष मंडलिक, दीपक पावशे, शिवाजी खांडेकर, अनिल पाटील, मनोहर हुंदरे, पियुष हावळ आदींनी आपले विचार मांडले. तसेच काळा दिनाच्या सायकलफेरीत मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.
आपल्या अध्यक्षीय समारोपात माजी आमदार मनोहर किणेकर यांनी 1 नोव्हेंबर काळा दिनी कडकडीत हरताळ पाळून समिती कार्यकर्ते व मराठी भाषिकांनी मूक सायकल फेरीत प्रचंड संख्येने सहभागी होण्याद्वारे पुन्हा एकदा महाराष्ट्रात सामील होण्याची आपली तीव्र इच्छा प्रकट करावी असे आवाहन केले. बैठकीस बेळगाव तालुक्यातील म. ए. समितीच्या अन्य पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments