- केडीपी त्रैमासिक बैठकीत खासदार शेट्टर यांची सूचना
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात सन २०२४-२५ साठी त्रैमासिक जिल्हा विकास समन्वय व पर्यवेक्षण समिती (दिशा) नियोजन बैठक पार पडली. खासदार जगदीश शेट्टर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चिक्कोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आदी उपस्थित होते.
या बैठकीत कृषी, महसूल विभागासह विविध विभागांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. बेळगाव महापालिकेबाबत खासदार आणि आमदारांनी आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याकडून माहिती घेतली. ह्यूम पार्क येथे तीन विकास कामे पूर्ण झाली आहेत. अमृत - २ योजनेसाठी २५ कोटींच्या अनुदानातून कामांचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यावर खासदार जगदीश शेट्टर यांनी याबाबत माहिती घेण्याची सूचना केली. डॉ. आंबेडकर गृहनिर्माण योजना, राजीव गांधी गृहनिर्माण आणि वाजपेयी गृहनिर्माण योजनेंतर्गत एकूण ३०० घरांपैकी १२५ घरांना मंजुरी देण्यात आली असून १७५ घरे प्रलंबित आहेत. त्यावर खासदार जगदीश शेट्टर यांनी तांत्रिक त्रुटी दूर करून लवकरच लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत कृषी विभागाकडून पिकांचे नुकसान व भरपाई वाटपाची माहिती घेतली. कृषी, महसूल आणि फलोत्पादन विभागाच्या संयुक्त पथकाने बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी, मुदलगी परिसर, अथणी आणि कागवडा तालुक्यांमध्ये ऊस पिकांचे सर्वाधिक नुकसान झालेल्या ठिकाणी सर्वेक्षण केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, २४,५७७ हेक्टर क्षेत्रात उगवलेल्या पिकाचे नुकसान झाले असून उद्यापासून मदत वाटप सुरू होईल.
यावेळी महसूल,पाटबंधारे, महानगर महामंडळ, फलोत्पादन, कृषी, हेस्कॉम आदी विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.
0 Comments