• बेळगावात भाजपच्यावतीने चन्नमा सर्कल येथे निदर्शने  

बेळगाव / प्रतिनिधी 

मुडा प्रकरणी उच्च न्यायालयाने सिद्धरामय्या यांची याचिका फेटाळून लावली. या निकालानंतर बेळगावातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज शहरातील चन्नम्मा सर्कलमध्ये निदर्शने करून आंदोलन करण्यात ले. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. 

याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी आमदार तथा ग्रामीण भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संजय पाटील म्हणाले, सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे हे देशाच्या संविधानाचा आणि कायद्याचा आदर करणारी कृती असेल. भारतातील संविधान आणि कायद्याचा सर्वांना समान आदर आहे. कायद्याच्या आदेशाचे पालन करणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. हे जाणून घेत सिद्धरामय्या यांनीही ताबडतोब मुख्यमंत्री पदाचा त्याग करावा, असे त्यांना कडक शब्दात सांगितले.

तर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी भाजप नेते मुरुगेंद्रगौडा पाटील यांनीही कर्नाटकातील काँग्रेस सरकारसह मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर जोरदार टीका केली.  

यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके, बेळगाव ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, बेळगाव भाजप महानगर अध्यक्षा गीता सुतार, भाजपा नेते व माजी आमदार संजय पाटील, भाजप नेते मुरुगेंद्रगौडा पाटील, भाजप महानगर उपाध्यक्ष भाऊगौडा पाटील, भाजप ओबीसी महानगर अध्यक्ष प्रभू हुग्गार आदि उपस्थित होते.