• कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि वनविभागाच्या निष्काळजीपणाबाबत नाराजी   

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि वारा सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान आज बुधवारी सकाळीच शहरातील कॅम्प परिसरानजीक एका प्रसिद्ध दुचाकी शोरूमच्या पाठीमागे असलेल्या घरावर झाड कोसळून विजया बडगावकर नामक महिला जखमी झाली. तसेच घरानजीक उभ्या केलेल्या दुचाकींचेही नुकसान झाले. कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याने सदर महिलेने नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच येथील सुनील गोजे यांच्या मालकीच्या दुकानावरही झाड कोसळून नुकसान  झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. ही धोकादायक झाडे हटवण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड व वनविभागाला अनेकवेळा विनंती करूनही उपयोग झाला नाही. शाळकरी मुले येथून दररोज ये - जा करतात. येथील मंदिरात महिलांसह भाविक येतात. त्यामुळे मोठा अनर्थ घडण्यापूर्वी  कॅन्टोन्मेंट बोर्ड व वनविभागाने धोकादायक झाडे हटवून समस्या सोडवावी अशी मागणी येथील जनतेतून केली जात आहे.