बेळगाव / प्रतिनिधी 

पावसाळा सुरू झाल्याने रुग्ण चिंतेत असताना बेळगावातील बीम्स रुग्णालय आज पुन्हा चर्चेत आले आहे. बेळगावचे बीम्स रुग्णालय कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता आणखी एका प्रकारामुळे ते चर्चेत आले आहे. बेळगावात पावसाळा सुरू होताच बीम्स  रुग्णालयाच्या भिंतीवरून पाणी उसळू लागते. परिणामी भिंतींवर बुरशीची वाढ होते, त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रूग्णालयाच्या खाटांना जोडलेल्या ऑक्सिजनच्या नळ्या आणि भिंतीजवळ ठेवलेल्या औषधांवरही बुरशी पसरू लागल्याने  रुग्णांची  चिंता वाढली आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणारा ऑक्सिजन आणि औषधे या बुरशीमुळे खराब होण्याची शक्यता आहे. गरीब मध्यमवर्गीय लोक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात येतात. मात्र, येथील परिस्थिती चिंताजनक असून, संबंधित अधिकाऱ्यांनी ही समस्या सोडविण्यासाठी कार्यवाही करावी, अशी रुग्णांची मागणी आहे.