गोकाक / वार्ताहर
बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अतिवृष्टीमुळे घटप्रभा नदीत बुडालेल्या लोळसूर पुलाच्या दुरवस्थेचा आढावा घेतला व नवीन पूल बांधण्याबाबत सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
मंत्री सतीश जारकीहोळी यांनी अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या गोकाक शहरातील विविध भागाच्या विकासासाठी कंबर कसली आहे, पूर आला की लोळसूर पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे जनतेला वारंवार त्रास होत आहे.
मंत्री सतीश जारकीहोळी यांनी नवीन पुलाची ब्ल्यू प्रिंट पाहिल्यानंतर अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, संकेश्वर-यरगट्टी राज्यमार्गावरील लोळसूर पूल हा खूप जुना असून दरवर्षी पावसाळ्यात या पुलावर पाणी साचते. त्यामुळे येथे अधिक उंचीचा नवीन पूल बांधण्याची गरज आहे. नवीन पुलाच्या बांधकामासाठी सुमारे ४० कोटी रुपयांची तरतूद यापूर्वीच करण्यात आली आहे. अनुदान जाहीर झाले असून, सर्व प्रक्रिया पूर्ण करून सहा महिन्यांत काम सुरू होईल, असेही ते म्हणाले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभागाचे अधिकारी, काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित होते.
0 Comments