• भ्रष्टाचारात गर्तेत अडकलेली महापालिका बरखास्त करण्याची मागणी
  • जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सादर केले निवेदन  
 

बेळगाव / प्रतिनिधी 

भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेल्या बेळगाव महापालिकेवर बरखास्तीची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बेळगावातील विविध संघटनांनी आज निदर्शने केली.

बेळगावात सोमवारी बेळगावातील विविध संघटनांनी मनपातील भ्रष्टाचाराला आळा घालावा, मनपा बरखास्त करण्यात यावी, या मागणीसाठी भव्य निषेध रॅली काढली. यावेळी घोषणाबाजी करून संताप व्यक्त करण्यात आला. शहरातील राणी चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगाव महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली शहरातील लोकांच्या जमिनी बळकावून रस्ता तयार करण्याचा प्रयत्न झाला आहे. 20 कोटींचा दंड मनपा भरणार हा नगर सेवकांनी बैठकीत घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

मनपाने घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या जागेवर रस्ता तयार करण्यात आला होता ती जागा महापालिकेने यापूर्वीच परत केली आहे. मात्र तेथे रस्ता तयार करण्यासाठी खर्च झालेल्या लाखो रुपयांचा दंड कोण भरणार? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

हे सर्व होत असतानाही दक्षिणचे आमदार गप्प असून त्यांनी स्वत: भरपाई द्यावी. अर्धवट स्थितीतील स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करावीत, जोपर्यंत मनपा भ्रष्टाचाराला चाप बसणार नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील, असा इशारा श्री रामसेना हिंदुस्थानचे संस्थापक आणि समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी दिला. या निषेध रॅलीत बेळगावातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.