बेळगाव : विद्यार्थी दशेत आपल्याला कोण व्हायचे आहे ते निश्चित करणे गरजेचे असते.अथक परिश्रम, जिद्द चिकाटीने ध्येय गाठता येते त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. अधिकारी बनण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी विद्यार्थीदशेत सुरू करा. स्वत:चा आत्मविश्वास निर्माण करायला शिक्षक, पालकांचे मार्गदर्शन घ्या,  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता आहे.  पण मोबाइल मधे ते जादा वेळ फुकट घालवतात, पुस्तके वाचनातून आत्मविश्वास निर्माण होईल. आरोग्य सशक्त ठेवून अधिकारी होण्याची स्वप्ने बघा नक्कीच आयुष्यात यशस्वी व्हाल असे मौलिक विचार प्रमुख वक्ते  वाय. पी. नाईक यांनी बिजगर्णी येथे आयोजित केलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या प्रतिक्षा कदम हिच्या सत्कार सोहळ्यात व्यक्त केले. बिजगर्णी गावचे ज्येष्ठ पंच यशवंत जाधव यांची नात प्रतिक्षा कदम हिने नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षेत दैदिप्यमान यश संपादन करुन राज्यात मुलिंमध्ये तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल बिजगर्णी गावात भव्य दिव्य सत्कार सोहळा संपन्न झाला.अध्यक्षस्थानी वसंत अष्टेकर होते. 

प्रारंभी के. आर. भास्कर यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी बिजगर्णी ग्रामपंचायत, ग्रामस्थ मंडळ, श्री ब्रह्मलिंग सोसायटी, तिरंगा युवक मंडळ, कावळेवाडी वाचनालय, श्री सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने, बेळवटीचे एन.के.नलावडे, आदी गावातील व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह, भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी व्यासपीठावर वसंत अष्टेकर,सौ रेखा नाईक, मनोहर बेळगावकर, अॅड नामदेव मोरे, सत्कार मूर्ती प्रतिक्षा कदम,तिचे आईवडील प्रकाश कदम,सौ.प्रिंयाका कदम, यशवंत जाधव, श्रीरंग भास्कर,एन.के.नलवडे, सौ सुलभा के. भाषकर, उपस्थित होते. यावेळी माजी चेअरमन मनोहर बेळगावकर, उपाध्यक्ष अॅड नामदेव मोरे, एन.के.नलावडे, परशराम भास्कळ, यांनी मनोगत व्यक्त करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  

याप्रसंगी पोलिस उपनिरीक्षक प्रतिक्षा कदम हिने कृतज्ञता व्यक्त करुन आपण खडतर मैदानी चाचणीत यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये जिद्द चिकाटी कशी निर्माण केली प्रबळ इच्छा शक्तीतून असाध्य ते साध्य करता येते.महिलांनी मागं न राहता स्पर्धा परीक्षा द्यावी असे आवाहन तिने केले. 

या सोहळ्याला मंगला जाधव,गावडू मोरे,पी.एस.भाष्कळ, बबनराव जाधव, लक्ष्मण कांबळे, गोविंद कांबळे, मनोहर पाटील, संजू बेळगावकर,मोणापा भास्कर,बाळू कांबळे आदी मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.  

यावेळी संदीप अष्टेकर यांनी गावातील तरुण पिढीला प्रेरणा देण्यासाठी जे कोणी भविष्यात स्पर्धा परीक्षा देतील त्यासाठी लागणारा पूर्ण खर्च आपण देणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन के.आर.भाष्कळ, आभार संदीप अष्टेकर यांनी मानले गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.