• स्थानिकांसह ७ ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांचा जिल्हाप्रशासनाला अल्टिमेटम  

बेळगाव / प्रतिनिधी 

जीर्ण झालेला बेळगाव - वेंगुर्ला रोड येत्या १५ दिवसात दुरुस्त करण्यात यावा, रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी करत येथील स्थानिकांसह ७ विविध ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आज आंदोलन केले.

बेळगाव - वेंगुर्ला रोडची दुरवस्था झाली असून या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.. अविकसित रस्त्यावर जीव मुठीत घेऊन जा - ये करावी लागत असल्याने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
बेळगावच्या पश्चिम भागातील 7 ग्रामपंचायतींच्या 30-35 गावांतील लोक या रस्त्याचा वापर करतात. या रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याचे रुंदीकरण लवकर होणे गरजेचे आहे. रस्त्यावर पथदिवे बसवून दररोज होणारे अपघात रोखण्यासाठी रस्ते विकासाचे काम हाती घेण्यात यावे. यापूर्वीही जिल्हाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. पंधरा दिवसांत रस्ता विकसित न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

हिंडलगा श्री गणेश मंदिर, सुळगा, उचगाव क्रॉस, तुरमुरी, बेकीनकेरे गावातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता शिनोळीपर्यंत पूर्ण दुरुस्त करण्यात यावा. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राला जोडणारा रस्ता विकसित केला आहे. मात्र कर्नाटक सरकार दुजाभाव का देत आहे? असा प्रश्न बेक्कीनकेरे ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा लक्ष्मी गावडे यांनी उपस्थित केला.

यावेळी 7 ग्रामपंचायतींचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांसह ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग घेतला.