चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. बांगलादेशला पहिल्या डावात १४९ धावांवर ऑलआऊट करत टीम इंडियाने २२७ धावांची मोठी आघाडी घेतली. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ विकेट्स गमावून ८१ धावा केल्या आहेत. यासह टीम इंडियाकडे ३०८ धावांची मजबूत आघाडी झाली आहे. खेळ संपला तेव्हा शुबमन गिल आणि ऋषभ पंत ही जोडी नाबाद परतली.
तत्पूर्वी दुसऱ्या दिवशी टीम इंडियाकडून आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने ६ बाद ३३९ धावांपासून खेळायला सुरुवात केली. मात्र बांगलादेशने टीम इंडियाला ७०-८० मिनिटातच ४ धक्के देत ऑलआऊट केले. टीम इंडियाचा पहिला डाव हा ३७६ धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून आर. अश्विन याने सर्वाधिक ११३ धावा केल्या. तर जडेजा आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी अनुक्रमे ८६ आणि ५६ धावांचे योगदान दिले. या व्यरिक्त इतर कुणालाही काही खास करता आले नाही. बांग्लादेशकडून हसन महमूद याने ५ विकेट्स घेतल्या. तास्किन अहमद याने तिघांना बाद केले. तर नाहीद राणा आणि मेहदी हसन या जोडीने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
त्यानंतर टीम इंडियाच्या ३७६ धावांच्या प्रत्युत्तरात बांग्लादेशचे फलंदाज भारतीय माऱ्यासमोर फ्लॉप ठरले. भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला १५० धावाही करु दिल्या नाहीत. बांग्लादेशचा पहिला डाव हा ४७.१ ओव्हरमध्ये १४९ धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने चौघांना बाद केले. मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाने प्रत्येकी २-२ विकेट्स मिळवल्या.
दरम्यान टीम इंडियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही खराब झाली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. रोहित ५ धावा करुन बाद झाला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल १० धावांवर आऊट झाला. विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र विराटला १७ धावांपेक्षा जास्त योगदान देता आले नाही. विराट बाद झाल्याने टीम इंडियाची १९.२ ओव्हरमध्ये ३ बाद ६७ अशी स्थिती झाली. त्यानंतर ऋषभ पंत आणि शुबमन गिल या दोघांनी खेळ संपेपर्यंत सावध खेळ केला. टीम इंडियाने दुसऱ्या डावात २३ षटकात ३ बाद ८१ धावा केल्या आहेत. पंत १२ आणि शुबमन गिल ३३ धावांवर नाबाद आहेत. तर बांग्लादेशकडून तास्किन अहमद, नाहिद राणा आणि मेहदी हसन मिराज या तिघांनी १-१ विकेट घेतली आहे.
0 Comments