• बांग्लादेश विरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या ६ बाद ३३९ धावा

क्रीडा : भारत आणि बांग्लादेश यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवस अखेर भारताने ६ गडी बाद ३३९ धावा केल्या आहेत. तर आर.अश्विन नाबाद १०२ आणि रवींद्र जडेजा नाबाद ८६ धावांवर खेळत आहेत. 

एकवेळ ६ बाद १४४ अशी स्थिती असताना भारताला ३०० धावसंख्या गाठणे कठीण झाले होते. पण आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने  ७ व्या विकेटसाठी १९५ धावांची भागिदारी करून भारताला सुस्थितीत आणले. दुसऱ्या दिवशी या दोघांकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. रवींद्र जडेजाला शतकासाठी अवघ्या १४ धावांची अवश्यकता असून पहिल्या सत्रात तो कामगिरी चोख बजावेल अशी आशा आहे. दुसरीकडे, भारताने पहिल्या दिवशीचा खेळ बांगलादेशच्या पारड्यातून खेचून आणला आहे.

पहिल्या दिवशी खेळाच्या पहिल्या सत्रात रोहित शर्मा अवघ्या ६ धावा करून तंबूत परतला. तर त्यानंतर आलेला शुबमन गिल तर खांतही खोलू शकला नाही. विराट कोहलीकडून फार अपेक्षा होत्या. पण त्या पूर्ण झाल्या नाही. अवघ्या ६ धावा करून बाद झाला. हसन महमूद पहिल्या सत्रात भारतीय फलंदाजांवर भारी पडला. यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंतने ६० धावांची भागीदारी केली. ऋषभ पंत ३९ धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल काही करतील अशी भाबडी आशा होती. पण यशस्वीने ११८ चेंडूत ५६ धावा केल्या आणि तंबूत परतला. तो बाद होत नाही तोच केएल राहुलची खेळी १६ धावांवर संपुष्टात आली. 

बांग्लादेशकडून हसन महमूदने सर्वात चांगला स्पेल टाकला. त्याने आघाडीचे महत्त्वाचे विकेट घेतल्या. नहीद राणा आणि मेहदी हसन मिराजने प्रत्येकी एक गडी बाद केला. पण त्यांना आर अश्विन आणि रवींद्र जडेजा ही जोडी फोडता आली नाही.