बेळगाव / प्रतिनिधी 

सार्वजनिक श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरखाली सापल्याने एका गणेश भक्ताचा दुर्दैवी मृत्यू तर अन्य एकजण जखमी झाला. कपिलेश्वर उड्डाणपूलावर बुधवारी सकाळच्या  सुमारास श्रीमूर्ती ट्रक, ट्रॅक्टर आदी वाहनावरून कपिलेश्वर उड्डाण पुलावरून कपिलेश्वर तलावाकडे विसर्जनासाठी नेण्यात येत असताना ही घटना घडली. सदानंद बी. चव्हाण-पाटील (वय ४८ रा. पाटील गल्ली, सुळगा ; येळ्ळूर ता.बेळगाव) असे मृत गणेशभक्ताचे नाव आहे. 

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कपिलेश्वर उड्डाण पुलाच्या उतारावर ट्रॉलीमधून बाप्पाची मूर्ती घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर अचानक नियंत्रण सुटल्यामुळे वेगाने पुढे गेला. यावेळी बेसावध असलेल्या सदानंद चव्हाण यांना ट्रॅक्टरची धडक बसल्याने ते थेट ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडताचं त्यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टर गेला. गंभीर जखमी झालेल्या सदानंद चव्हाण यांना तातडीने बेळगाव जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सदर घटना घडताच बेळगाव मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, माजी महापौर विजय मोरे, लोकमान्य टिळक गणेश महामंडळ बेळगावचे अध्यक्ष विजय जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेतली. याचप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्येही भेट दिली. बेळगावमध्ये घडलेल्या या घटनेनंतर मृत गणेशभक्तांच्या कुटुंबियांना प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने आर्थिक मदत देऊ करावी, असे आवाहन माजी महापौर विजय मोरे यांनी केले आहे.