बेळगाव / प्रतिनिधी
परंपरेनुसार बेळगाव शहरातील नरगुंदकर भावे चौक येथे मंगळवारी अनंत चतुर्दशी दिवशी दुपारी श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ बेळगाव आणि श्री लोकमान्य टिळक गणेश महामंडळ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शुभारंभाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर सविता कांबळे, शहराचे आमदार असिफ (राजू) सेठ, उपमहापौर आनंद चव्हाण, माजी आमदार ॲड. अनिल बेनके, भाजप नेते महांतेश कवटगीमठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, शहर पोलीस आयुक्त शहर पोलिस आयुक्त ईडा मार्टिन, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
नियोजित वेळेपेक्षा थोड्या उशिरा सुरू झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रारंभी श्री गणेश महामंडळांच्यावतीने व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार सेठ, जिल्हाधिकारी रोशन, माजी आमदार बेनके, कवटगीमठ आदींनी समायोजित विचार व्यक्त करून श्री गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्याबरोबरच विसर्जन मिरवणूक कोणतेही गालबोट न लागता शांततेत पार पाडण्याचे आवाहन सर्व सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांसह समस्त गणेश भक्तांना केले.
त्यानंतर शहराच्या प्रथम नागरिक महापौर सविता पाटील यांच्या हस्ते श्री गणरायाच्या मूर्तीचे पूजन आणि आरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर आमदार असिफ सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, शहर पोलिस आयुक्त ईडा मार्टिन, जि. पं. सीईओ राहुल शिंदे आदींनी ढोल वादन करून श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला चालना दिली. सदर शुभारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी भावे चौकात गणेश भक्तांची एकच गर्दी झाली होती.
0 Comments