बेळगाव / प्रतिनिधी 

हिंसाचारग्रस्त बांग्लादेशातील हिंदूंवरील हिंसाचार आणि त्यांच्या मालमत्तेवर तसेच मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांबाबत केंद्रातील भाजप सरकार गप्प आहे, याविरोधात श्रीराम सेनेच्या वतीने आज बेळगावात निषेध नोंदविण्यात आला.

श्रीराम सेनेचे गंगाधर कुलकर्णी यांनी या प्रकाराविरोधात संताप व्यक्त करत केंद्र सरकारचा निषेध केला. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचार व हत्यांचा निषेध करण्यासाठी बेळगावात आज आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रातील भाजप सरकार याप्रकरणी गप्प असल्याबाबत संताप व्यक्त करण्यात आला.

कर्नाटकात बेकायदेशीर रित्या राहात असलेल्या बंगाली मुस्लिमांना हद्दपार करण्यासाठी बेळगावच्या पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. श्रीरामसेनेचे प्रदेशाध्यक्ष गंगाधर कुलकर्णी म्हणाले, हिंसाचारग्रस्त बांगलादेशातील हिंदूंवर होणारा हिंसाचार आणि त्यांच्या मालमत्तेवर व मंदिरांवर होणारे हल्ले यावर भाजप सरकार मौन बाळगून आहे. बेकायदेशीर रित्या राहणाऱ्या बांगलादेशी मुस्लिमांची संख्या वाढत असून केंद्र सरकार हिंदूंचे रक्षण करण्यात कमी पडत असल्याचे ते म्हणाले.

श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष गंगाधर कुलकर्णी, विठ्ठल घाडी, रविकुमार कोकीतकर, विनय अंग्रोळी यांच्यासह श्री राम सेनेचे शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.