- बेळगावात शोषित समाजाची भाजप - जेडीएस विरोधात तीव्र निदर्शने
- चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला निषेध मोर्चा
- मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दर्शवला पाठिंबा
- राज्यपालांनी मुडा प्रकरणी निर्भीडपणे काम करावे ; आंदोलकांची मागणी
- जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्र सरकारला निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
मुडा प्रकरणात अडकवून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बदनामीसाठी षडयंत्र रचले जात आहे. राज्यपालांनी कोणाच्याही दबावाला बळी पडू नये, या मागणीसाठी बेळगावात भाजप आणि जेडीएसच्या विरोधात शोषित समाजाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या कर्नाटकातील शोषित समाजाने आज बेळगावात जोरदार आंदोलन केले. तत्पूर्वी शहरातील राणी चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.
याप्रसंगी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या प्रतिमेला अभिषेक करून नोटीस देणाऱ्या राज्यपालांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. राजकीय जीवनात भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुडा घोटाळ्यात काहीही चुकीचे केले नाही, अशा घोषणाही आंदोलकांनी दिल्या. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्र सरकारला देण्यात आले.
यावेळी बोलताना काँग्रेसचे बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ म्हणाले, सिद्धरामय्या यांच्या ४५ वर्षांच्या राजकारणात भ्रष्टाचाराचा एकही काळा डाग नाही. मात्र, भाजप आणि जेडीएसने त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्याचा कट रचला आहे. राज्यपालांनी लोकशाहीच्या आज्ञेत राहून काम केले पाहिजे. या घोटाळ्याच्या आरोपांवर आम्ही कायदेशीर कारवाई करू.राज्यपालांनी आपली जबाबदारी विसरल्यास राज्यातील सर्व जिल्ह्यातील मागासवर्गीयांना राजभवनाला घेराव घालावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
तर बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सर्व समाजाच्या कल्याणासाठी सुशासन करत आहेत. मात्र, केंद्रातील आघाडी सरकार सिद्धरामय्या यांची बदनामी करण्यात गुंतले आहे. अत्याचारित समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला आहे. सिद्धरामय्या यांच्या राजकीय जीवनात एकही काळा डाग नाही. मुडामध्ये त्यांची भूमिका नाही. राज्यपाल कार्यालयाचे भाजप कार्यालयात रूपांतर करण्यात आले आहे. राज्यपालांनी कोणत्याही दबावापुढे झुकू नये,असे ते म्हणाले.
सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या विरोधात षडयंत्र रचले जात असून, राज्यपालांनी घटनात्मक आणि कायदेशीर निर्णय घ्यावा. भाजप आणि जेडीएसच्या नेत्यांच्या दबावाला बळी पडू नये. राज्यपालांनी स्वतःची जबाबदारी विसरल्यास शोषित वर्गाकडून राज्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नेते राजेंद्र सुन्नक्की यांनी दिला. यावेळी शोषित, मागासवर्गीय नेते, काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments