बेंगळूर : घटप्रभा नदीमुळे दरवर्षी होणाऱ्या नुकसानीबाबत तातडीने कार्यवाही करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. बुधवारी कृष्णा या मुख्यमंत्र्यांच्या गृहकचेरीत भेटीसाठी गेलेल्या मुधोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी त्यांनी चर्चा केली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, घटप्रभा नदीमुळे दरवर्षी होणाऱ्या नुकसानीबाबत संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत बैठक घेतली जाणार आहे. तसेच पाटबंधारे मंत्री, महसूल मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांसोबत लवकरात लवकर बैठक घेऊन याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
घटप्रभा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या चार वर्षात एकूण ३४६३९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. 2019 मध्ये 15088 हेक्टर, 2021 मध्ये 7051 हेक्टर आणि 2024 मध्ये 12500 हेक्टर पिकाच्या झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला कायमस्वरूपी भरपाई देण्यात यावी, अशी विनंती शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना केली.
तसेच केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार बागायती ऊस पिकासाठी प्रति हेक्टर रु. 22,500 नुकसान भरपाई, तर इतर पिकांसाठी रु.17000 निश्चित करण्यात आली असून याचा शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे फायदा होणार नाही. आधीच कर्नाटक कृषी विद्यापीठात ऊस लागवडीचा खर्च 1.50 लाख रुपये प्रति हेक्टर ठरविण्यात आला असून हि बाब देखील अवैज्ञानिक आहे. इतर राज्यांच्या तुलनेत हि रक्कम अत्यल्प असून उसासाठी प्रति एकर 1 लाख आणि इतर पिकांसाठी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषांचा विचार न करता सर्व नुकसान झालेल्या शेतांची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी उत्पादन शुल्क मंत्री आर. बी. थिम्मापुर आदी उपस्थित होते.
0 Comments