बेळगाव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना
खासदार जगदीश शेट्टर 

बेळगाव / प्रतिनिधी 

सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याचा आमचा प्रयत्न नाही. घोटाळ्यांमुळे राज्यात नाजूक परिस्थिती निर्माण झाली असून सिद्धरामय्या स्वतः मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात ; असे बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी सांगितले. आज बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वाल्मिकी कॉर्पोरेशन आणि मुडा घोटाळ्यांबाबत मान्सून अधिवेशनात चर्चा करू दिली नाही. त्यांचा थेट मुडा घोटाळ्यात सहभाग आहे. मात्र, सीबीआय तपासाला सामोरे जाण्यास ते तयार नाहीत. अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ न शकलेल्या सिद्धरामय्या यांनी अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेद्वारे उत्तरे दिली. राज्यपालांनी आधीच नोटीस बजावली आहे आणि पुढील प्रकरण त्यांच्याकडे आहे, असे त्यांनी सांगितले. 

विरोधकांच्या मागण्या मान्य न करणाऱ्या सरकारविरोधात भाजपने मोर्चा काढला आहे. वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर आता केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएसनेही या पदयात्रेला पाठिंबा दिला आहे. पदयात्रेबाबत ते म्हणाले की, वरिष्ठांच्या सूचनेनुसार पदयात्रा होणार असून, उत्तर कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटकात कोणताही फरक नाही.

सिद्धरामय्या यांना भाजपने मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचा प्रयत्न केल्याचा उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा आरोप फेटाळून लावत काँग्रेस सरकार घोटाळ्यांमध्ये अडकले आहे. मुडा घोटाळ्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा थेट सहभाग आहे. राज्यात नाजूक परिस्थिती निर्माण झाली असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या स्वतः राजीनामा देतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असे खासदार जगदीश शेट्टर म्हणाले. 

याशिवाय बेळगाव कॅंटोन्मेंट बोर्डच्या अखत्यारीतील सार्वजनिक क्षेत्राचा महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्याबाबत केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांच्याशी चर्चा करून त्यांना पटवून दिले आहे. याबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पात राज्यावर अन्याय नाही. राज्याला ४८ हजार कोटींहून अधिक अनुदान देण्यात आले आहे. रेल्वे विभागाला दरवर्षी ७००० कोटी रुपये दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.