• कृष्णा नदीवरील कुडची पूल पाण्याखाली

चिक्कोडी / वार्ताहर 

चिक्कोडी परिसर आणि महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सुरू असलेल्या  संततधार पावसामुळे कृष्णा नदीवरील कुडची पुलावर पाणी आले आहे.जमखंडी व उगार यांना जोडणारा हा पूल पाण्याखाली गेल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. खबरदारी म्हणून कुडची पोलिसांनी बॅरिकेट्स लावून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा नद्यांच्या पाण्याची आवक वाढली आहे. दूधगंगा नदीच्या वाढत्या पाण्यामुळे एकसंबा शहरातील दोनवाड मार्गावरील थोरपट्टी येथे नागरिक स्वतःची गुरे आणि पशुखाद्य सुरक्षित स्थळी हलविण्यात व्यस्त आहेत.

कृष्णा नदीत सध्या ८५ हजार क्युसेकने पाण्याची आवक वाढल्याने चिक्कोडी उपविभागातील ८ पूल पाण्याखाली गेले आहेत. दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. परिणामी निप्पाणी तालुक्याच्या करदगा गावातील ग्रामदैवत बंगाली बाबा मंदिराला पुराच्या पाण्याने व्यापले आहे. अजूनही चिक्कोडी तालुक्यातील दत्तवाड - मलिकवाड,  कारदगा - भोज , भोजवाडी - कुन्नूर निप्पाणी तालुक्यातील हे पूल पाण्याखाली आहेत.