गोकाक / वार्ताहर 

गोकाक हद्दीतील लोळसूर पुलावर आलेले  पाणी ओसरले असून, लवकरच पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

गोकाक तालुक्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या लोळसूर  पुलाला जिल्हा प्रभारी सचिव विपुल बन्सल व जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर जिल्हा प्रभारी सचिव व जिल्हाधिकाऱ्यांनी गोकाक शहरात सुरू केलेल्या केअर सेंटरला भेट देऊन तेथील यंत्रणेची पाहणी केली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, गेल्या तीन दिवसांत पावसाचे प्रमाण कमी झाले असून पूरस्थिती नियंत्रणात आहे. शहरातील चिक्कोडी आणि लोळसूर पुलावर आलेले  पाणी ओसरले असून, लवकरच पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. पाण्यामुळे पुलावरील रस्ता खराब झाला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा होणार असून त्यांना जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली जाणार आहे. यापूर्वीच जिल्हा पालकमंत्र्यांशी बोलून गोकाक व इतर भागातील पूरस्थितीबाबत चर्चा केली होती. महाराष्ट्रात पाऊस कमी झाल्यामुळे हिडकल जलाशयातून ३५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग घटप्रभा नदीत करण्यात येत आहे. सध्या आमच्या जिल्ह्यात कोणतीही अडचण नाही असे ते म्हणाले. 

याबाबत आपण यापूर्वीच जिल्ह्याचे पालकमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधींशी बोललो असून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून कायमस्वरूपी तोडगा काढू. महसूलमंत्री बेळगावात आले असता,  अनेक बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोळसूर पुलाची तपासणी करून अहवाल दिल्यानंतर तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.