- उस्ते वाळपई गोवा येथील पायी वारीचे सुळगा (हिं.) येथे भव्य स्वागत
सुळगा (हिं.) / वार्ताहर
सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी थेट उस्ते सत्तरी वाळपई गोवा येथील श्रीराम माऊली वारकरी मंडळाचे वारकरी गोव्यावरून गेली दोन वर्षे पंढरपूरला पायी वारी करत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचे रविवारी सुळगा (हिं.) येथे आगमन होताच मारुती मंदिरामध्ये स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी विद्यमान ग्रा. पं. सदस्य शट्टुपा उर्फ शेंदूर बाळू पाटील यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी वारकऱ्यांसाठी हनुमान मंदिर परिसरात अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. तत्पूर्वी तिलारीमार्गे ८५ किलोमीटर चालत ही वारी शनिवारी येळेबैल येथे विश्रांतीसाठी होती. ऑन. कॅप्टन धनाजी मोरे व कुटुंबीयांनी भोजन व राहण्याची व्यवस्था केली.
श्रीराम मंदिर उस्ते वाळपई गोवा येथून या वारीची सुरुवात होते. पुढे पायी चालत डोंगर माथ्यावरून जंगलातील वाटेने तिलारीमार्गे साट्रे गावातून ही वारी पारवाड येथे दाखल होते. तिथून पुढचा टप्पा सुरू होतो. वारीच्या सोहळ्याचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे. वारीत सहभागी होणाऱ्याला वारी म्हणजे काय आणि वारीचे महत्त्व समजते. वारी ही शब्दांपेक्षा अनुभवणे खूप महत्त्वाचे आहे, असे मत वारीचे संयोजक पांडुरंग गावकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
यावेळी ते पुढे म्हणाले वारीमुळे भरकटलेल्यांना जगण्याची योग्य दिशा मिळते. तर व्यसनाधीन बनलेल्यांना वारी हा व्यसनमुक्तीचा मार्ग आहे. यामध्ये सहभागी झाल्यानंतर माणसाला शारीरिक व्याधींचाही विसर पडतो असे त्यांनी सांगितले. व्यक्तीचे आचरण चांगले आणि विचार शुद्ध असतील तर वारीतून होणारी पांडुरंगाची सेवा फलद्रूप होऊन त्याचे निश्चित चांगले फळ मिळते, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. तसेच आजच्या स्मार्ट युगात युवा पिढीवर अध्यात्माचे संस्कार करण्यासाठी वारी हा योग्य पर्याय असल्याचे ते म्हणाले. विठू नामाचा गजर करत वारीत सहभागी व्हा, वारीतील अनुभव इतरांना सांगा. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवा, तुमच्या जीवनात नक्की बदल घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- दिंडीसोबत मुक्या श्वानाची पायी वारी :
व्यक्तीप्रमाणे मुक्या प्राण्यांमध्येही परमेश्वर असतो, श्रद्धेने भक्ती केली तर त्याचा प्रत्यय अनुभवता येतो, हे सांगताना पांडुरंग गावकर यांनी दरवर्षी येळेबैल पासून पंढरपूर पर्यंत वारीला साथ देणाऱ्या श्वानाचे उदाहरण दिले.
दरम्यान प्रतिवर्षीप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रा. पं. सदस्य शट्टूप्पा उर्फ शेंदूर बाळू पाटील यांनी दिंडीचे स्वागत करून अल्पोपहाराची व्यवस्था केल्याबद्दल दिंडीच्यावतीने पांडुरंग गावकर यांनी त्यांचा सत्कार केला, तसेच शेंदूर बाळू पाटील, माजी सैनिक परशराम सांगावकर, ऑन. कॅप्टन धनाजी मोरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व युवकांचे आभार मानले.
याप्रसंगी शट्टूप्पा उर्फ शेंदूर बाळू पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुंदकर, बेळगाव महापालिकेचे माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनीही वारीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर मान्यवरांच्याहस्ते पूजन करून पुढील वाटचालीसाठी दिंडीला चालना देण्यात आली.
यावेळी उचगाव येथील एलआयसी प्रतिनिधी पुंडलिक पावशे, बाबू कोकीतकर, माजी सैनिक परशराम सांगावकर, साईनाथ पाटील, मंथन बोकडे, मनोहर पाटील, रोहित निलजकर, युवराज चौगुले, सुरज चौगुले, रोहन पाटील, चेतन पाटील, रोहन निलजकर आदि उपस्थित होते.
0 Comments