- खानापूर तालुका म. ए. समितीची मागणी
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक समितीचे अध्यक्ष सूर्याजी सहदेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवस्मारक येथे संपन्न झाली. या बैठकीत खानापूर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या शासकीय सार्वजनिक इमारतीचे येत्या काही दिवसांमध्ये लोकार्पण होणार आहे. त्यामध्ये आरोग्य खात्याच्या महिला व बालकांचा दवाखाना, खानापूर बस स्थानक इमारत, हेस्कॉम कार्यालयाची इमारत इत्यादी नागरिकांच्या सेवेसाठी यापुढे उपलब्ध असणार आहेत. तरी या इमारतीवर मराठी फलक लावण्याचे जाणीवपूर्वक टाळण्यात आलेले आहे, प्रशासनाने याची दखल घेऊन ताबडतोब त्या इमारतीवर मराठी फलक लावावेत यासाठी खानापूरचे विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन त्यांना या फलकाबद्दल माहिती देऊन कारवार मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार विश्वेश्वर कागेरी हेगडे यांना सुद्धा दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. यावेळी त्यांनी शासनाच्या कायद्यानुसार मराठी बोर्ड बसवण्याचे आश्वासन दिले.
तसेच खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांची संख्या ७५ टक्के च्या पुढे असून त्या इमारतीवर मराठी भाषेचे फलक लावावे व नंतर त्यांचे लोकार्पण करावे, तालुका आरोग्य इमारत, बसडेपो आगाराची नवीन इमारत व हेस्कॉमचे बांधण्यात आलेले नवीन कार्यालय या तिन्ही कार्यालयावर मराठीमध्ये नावे लिहावी असा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. तसेच तालुक्यातील इतर घडामोडींवर चर्चा होऊन यामध्ये उपस्थित असलेल्या खानापूर तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मते व्यक्त केली व येणाऱ्या काही दिवसात संघटन बळकट करण्यासाठी गावांना भेटी देण्याचे एकमताने ठरविण्यात आले. यावेळी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील,माजी सभापती सुरेशराव देसाई, पी.एच.पाटील,रवी पाटील,राजू पाटील,भुपाल पाटील आदी उपस्थित होते.
0 Comments