- जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची सूचना
बेळगाव / प्रतिनिधी
राज्यभरात डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात यावीत. डेंग्यूच्या चाचण्या वाढवायला हव्यात. डेंग्यू पॉझिटिव्ह व्यक्तींना योग्य ते वैद्यकीय उपचार देण्यात यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिल्या.
बुधवार दि. १० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आपत्ती व्यवस्थापन आणि डेंग्यू नियंत्रणबाबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत ते बोलत होते.
डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, शहरी व ग्रामीण भागातील सर्व नाल्यांची स्वच्छता करण्यात यावी. डेंग्यू नियंत्रणासाठी अतिरिक्त कर्मचारी नेमावेत, आरोग्य विभाग, महानगरपालिका, स्थानिक संस्था आणि तालुका पंचायती यांच्या समन्वयाने काम करून जिल्ह्यातील डेंग्यू नियंत्रणात पुढे जावे, असे ते म्हणाले.
- आपत्ती व्यवस्थापन :
चालू हंगामातील चांगल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नदीपात्रात पूरस्थिती निर्माण झाल्यास आवश्यक संरक्षक उपकरणांच्या उपलब्धतेबाबत अहवाल सादर करावा. पूरस्थितीत उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने तातडीने आवश्यक साहित्याचा साठा करावा, तसेच विषबाधेने होणारे मृत्यू व त्रास टाळण्यासाठी आवश्यक उपकारणांचा साठा करावा, असे त्यांनी सांगितले.
- पिण्याचे पाणी :
शहरी व ग्रामीण भागात शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच नियमित पाण्याच्या चाचण्या कराव्यात, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.
संबंधित अधिकाऱ्यांनी शहरातील, स्थानिक संस्था आणि जिल्ह्यातील ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या सहाय्यता केंद्रांना भेट द्यावी आणि त्या केंद्रांमधील सुविधांची तपासणी करून अहवाल द्यावा. याशिवाय गोठ्यांचा तपशील देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले, शेजारच्या महाराष्ट्रातील वाढत्या पावसामुळे जिल्ह्यातील नदीपात्रातील गावांना पूर येण्याची शक्यता असून, या पार्श्वभूमीवर पूर नियंत्रणासाठी आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
पूर परिस्थितीच्या बाबतीत, तपशील प्रदान केल्यास आवश्यक संरक्षणात्मक उपकरणे पुरवण्यासाठी पावले उचलली जातील. ग्रामपंचायतींमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका अनिवार्यपणे घेऊन अहवाल सादर करावा, अशी सूचना त्यांनी केली.
या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, बेळगावचे उपविभागीय अधिकारी श्रावण नाईक, बैलहोंगल उपविभागीय अधिकारी प्रभावती फक्कीरपूर, कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, ग्रामपंचायतीचे नियोजन संचालक रवी बंगारप्पान्नावर, सामाजिक विभागाचे संचालक गंगापूर, उपविभागीय अधिकारी डॉ. शिंत्रे यांच्यासह जिल्हातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
0 Comments