• ६.७० लाखाचा मुद्देमाल जप्त  
  • खडेबाजार पोलिसांची कारवाई 

बेळगाव / प्रतिनिधी 

घरफोडी प्रकरणातील दोघा चोरट्यांना अटक करून खडेबाजार पोलिसांनी त्यांच्याकडून ६ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या चोरट्यांनी शहर परिसरात तीन ठिकाणी घरफोड्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले. 

चेतन मारुती शिंदे (वय २६, रा. गणेशपूर) व करण उत्तम मुतगेकर (वय २६, रा. रघुनाथ पेठ अनगोळ) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर चोरट्यांनी गेल्या महिन्यात गणेशपूर, भवानीनगर येथे घरफोडी केली होती. यानंतर त्यांच्याकडूनच रामलिंगखिंड गल्लीत घरफोडी झाल्याचे उघडकीस आले आहे. येथील घरफोडीनंतर खडेबाजारचे निरीक्षक दिलीप निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक आनंद वाय. ए. व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास केला. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी तीन ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली.

त्यांच्याकडून साडेपाच लाखांचे ८ आठ तोळे सोने, २० हजाराची चांदी, लॅपटॉप, मोबाईल व १० हजाराची रोकड असा ६ लाख ७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. खडेबाजार पोलिसांच्या या कारवाईचे पोलिस आयुक्त ईडा मार्टिन, वाहतुक व गुन्हे शाखेच्या उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी कौतुक केले आहे.