• परीक्षेत फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य आरोपीला अटक 
  • बेळगाव मार्केट पोलिसांची कारवाई  

बेळगाव / प्रतिनिधी 

देशात एकीकडे भ्रष्टाचारामुळे नीट वैद्यकीय परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मात्र याचा गैरफायदा घेऊन सदर परीक्षेत कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक करत, त्यांना करोडो रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या आंतरराज्य आरोपीला अटक करण्यात बेळगावच्या मार्केट पोलिसांना यश आले. अरविंद उर्फ ​​अरुणकुमार (वय ४३ रा. तेलंगणा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. आज बेळगाव शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत पोलिस उपायुक्त रोहन जगदीश यांनी ही माहिती दिली. 

यावेळी ते पुढे म्हणाले, नीट वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर एमबीबीएसच्या जागा मिळतील, असे सांगून १० हून अधिक लोकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीचा मार्केट पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सदर आरोपीने परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून  सुमारे १ कोटी ३० लाख ४१ हजार ८८४ रुपये उकळले होते. तसेच संबंधित आरोपी प्रत्येकवेळी स्वतःचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक बदलून ठिकाण बदलत होता. त्यामुळे पोलिस तपासात अडचणी येत होत्या. 

अखेर बेळगाव मार्केट पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच कसून तपास करत आरोपीला महाराष्ट्रातील मुंबई येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडून १२ लाख रुपये आणि १२ लाख ६६ हजार ९०० रुपये  किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.