- दक्षता घ्या ; पाण्यात जाऊ नका : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची सूचना
बेळगाव / प्रतिनिधी
संततधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील सर्व धरणे भरली आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून जादा पाणी सोडण्यात येत असून, पाणलोट क्षेत्रातील नागरिकांनी काळजी घ्यावी अशी सूचना बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज बेळगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी ते पुढे म्हणाले, जिल्हा प्रशासनाने सर्वत्र काटेकोर दक्षता घेतली आहे. राजापूर बॅरेजमधून दररोज १ लाख ३५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कल्लोळ बॅरेजमधून हिप्परगी बॅरेजमध्ये १.५० क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. हिडकल जलाशयाची एकूण क्षमता ५१ टीएमसी असून, बॅकवॉटरसह ४३ टीएमसी पाणीसाठा आहे. दररोज ३ टीएमसी पाणी सोडले जात आहे. कृष्णा, चिक्कोडी, रायबाग, निपाणी कागवाडचे तहसीलदार यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे.
हुलगबळी - मंगाबस्ती, सत्ती, हलियाळ, या भागात पाणी घुसण्याची शक्यता असून, ग्रामस्थांना माहिती देण्याच्या सूचना तहसिलदारांना दिल्या आहेत. कागवाड उगार, येथील काही स्त्यांचा संपर्क तुटणार असून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
घटप्रभा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यास हुक्केरी, गोकाक, मुडलगी तालुक्यातील काही भागात पाणी तुंबण्याची शक्यता आहे. गोकाकला काही धोका नाही. मात्र अंकलगीमध्ये बळ्ळारी नाल्याचे पाणी शेतात जाण्याची शक्यता आहे. कुंदरगी येथील आडसिद्धेश्वर मठात पाणी घुसण्याची शक्यता असून येथील नागरिकांनी अंकली मठात स्थलांतर केले असल्याचे त्यांनी सांगितले.
खानापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. वनक्षेत्रातील लोकांना आवश्यक वस्तू, अन्न आणि औषधांचा पुरवठा केला जात आहे. येत्या २६ तारखेला खानापूर येथील वनपरिक्षेत्रात राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. एसडीआरएफ आणि अग्निशमन दल घटनास्थळी तळ ठोकून असल्याची माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्रातील कोयना आणि काळम्मावाडी जलाशयातून पाणी सोडले जात असल्याची माहिती मिळण्यासाठी कर्नाटक सरकारचे जलसंपदा विभाग आणि महसूल विभागाचे अधिकारी २४ तास घटनास्थळी तैनात राहणार आहेत. बेळगाव शहरातही पावसाचे पाणी सुरळीत वाहत असून कोणतीही अडचण येऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी अथणी, कागवाड, चिक्कोडी, सदलगा येथे भेट देऊन पाहणी केली. सावनिधी घाट येथे सुरू असलेल्या महामार्ग विकास कामादरम्यान टेकडी फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील ७३ पुलांपैकी २५ पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. काही ठिकाणी मगरी तरंगत आल्या आहेत. पाण्याचा दाब जास्त असल्याने कोणालाही पाण्यात न येण्याचा इशारा देण्यात आला अशी माहिती दिली.
जिल्हा पंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे म्हणाले, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी पाणी गरम करून प्यावे. गर्भवती महिलांनी अंगणवाडी व आशा कार्यकर्त्याच्या संपर्कात राहावे. शाळांच्या स्थितीचा आढावा घेऊन सुट्टी जाहीर केली जाते. जनावरांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन परिस्थिती कायम ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला बेळगाव शहर पोलीस आयुक्त ईडा मार्टिन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आदि उपस्थित होते.
0 Comments