- नागरिकांची सुरक्षित ठिकाणी स्थलांतरास सुरुवात
कोल्हापूर / प्रतिनिधी
इशारा पातळी ओलांडून पंचगंगा नदी धोका पातळीकडे जात आहे, ही पातळी केवळ एक फुटावर आहे. यामुळे संभाव्य महापुराचा धोका गृहित धरून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने अनेक रस्त्यावर पाणी आले आहे. जिल्ह्यातील ७९ बंधारे पाण्याखाली गेले असून ३५ रस्ते बंद झाले आहेत. कोल्हापूर ते रत्नागिरी हा महामार्ग केर्लीजवळ बंद झाला आहे. अनेक गावातून स्थलांतर सुरू झाले आहे.
सहा दिवसानंतरही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. राधानगरी धरण ९१ टक्के भरले. दोन दिवसात कोणत्याही क्षणी हे धरण भरण्याची चिन्हे आहेत. पंचगंगा नदीने इशारा पातळी सोमवारी ओलांडली. मंगळवारी रात्रीपर्यंत पाणी पातळी ४२ फुटावर पोहोचले. यामुळे धोका पातळीकडे जाण्यासाठी केवळ एक फुट शिल्लक आहे. बुधवारी ही नदी धोका पातळी ओलांडण्याची चिन्हे आहेत. यामुळे अनेक गावात पाणी शिरले आहे.
कोल्हापूर ते पन्हाळा रस्त्यावरील केर्ली येथे रस्त्यावर पाणी आले आहे. यामुळे कोल्हापूर ते रत्नागिरी हा महामार्ग बंद झाला आहे. पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. याशिवाय आठ राज्यमार्ग व २६ जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद आहे. आंबेवाडी, प्रयाग चिखलीसह काही गावातून हळूहळू नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे.
0 Comments