• पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर स्मृती दिनानिमित्त आयोजन

कागवाड : बाहेर मुसळधार पाऊस पडत असताना कागवाडकर मात्र कवितांच्या सरींनी ओलेचिंब झाले. मैत्रीचं नातं, माणसाचा हरवत चाललेला विश्वास,  रोजच्या जगण्यातील दुःख, वेदना, निखळ प्रेम भावना, शेतकरी आत्महत्या आदी विषयांवरील भावस्पर्शी कविता ऐकण्याची संधी  कागवाड वासीयांना मिळाली. प्यावा वाटत नाही कधीच विषाचा घोट

पण काय करावं मायबाप सरकार..

मातीच्या वासानं भरत नाही पोट

अशा शेतकऱ्याच्या व्यथा मांडणाऱ्या ओळींनी रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. येथील शिवानंद महाविद्यालयात रंगलेल्या कवी संमेलनात कवींनी दर्जेदार कविता सादर करून मंत्रमुग्ध केले. 

शिवानंद महाविद्यालयात मराठी विभाग आणि शब्दगंध कवी मंडळातर्फे पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून मराठी कवितेवर एक दिवसीय राष्ट्रीय सेमिनार पार पाडले. तीन सत्रात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर आणि मल्लिकार्जुन महास्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. एस.ए. कर्की यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर बीजभाषक म्हणून प्रा. सुभाष सुंठणकर, कवी आबासाहेब पाटील, शिवाजी शिंदे, मराठी विभाग प्रमुख प्रा अशोक आलगोंडी, डॉ. अमोल पाटील उपस्थित होते.

यावेळी प्रा. सुभाष सुंठणकर यांनी शंकर चाफाडकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. कागवाडच्या इतिहासात पहिल्यांदाच भरणाऱ्या कवी संमेलनाचे साक्षीदार होता आले याविषयी गौरवोद्गार काढले आणि उपस्थितांना काव्य वाङ्मय प्रकारातील वृत्तांचे वैशिष्ट्ये समजावून दिली.

दुसऱ्या सत्रात उर्मिला शहा यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांचे कवी संमेलन पार पडले. मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सुंदर कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. यामध्ये वैष्णवी पवार, मोनिका डवरी, सानिया मोमीन, सानिका जाधव, प्रियंका पाटील, प्रियंका जाधव, मयुरी शिंदे, मनीषा पाटील, वैष्णवी चव्हाण, अरिफा जमादार, अश्विनी पाटील, प्रतीक्षा पाटील, श्वेता बाबर, प्रज्ञा कोरे, प्रणाली कट्टीकर आदी विद्यार्थिनींनी कविता सादर केल्या. प्रा. अशोक आलगोंडी यांनी निवेदनाने कवी संमेलन खुलवले. 

राष्ट्रीय सेमिनारचे तिसरे सत्र बेळगाव येथील शब्दगंध कवी मंडळाच्या कवींनी अक्षरशः गाजवले. कवी संमेलनाध्यक्ष म्हणून आबासाहेब पाटील उपस्थित होते. त्यांनी 'मोनालीसा' कवितेतून काबाड कष्ट करून जगणाऱ्याचे वास्तव मांडले. त्यानंतर परशराम खेमणे यांनी गझल, रेखा गद्रे यांनी शब्दांचे महत्त्व, भरत गावडे यांनी ऑनलाइन लग्न, कृष्णा पारवाडकर यांनी असंच असतं का प्रेम तसेच शैलजा पाटील, चंद्रशेखर गायकवाड, अश्विनी ओगले, अस्मिता अळतेकर, स्मिता किल्लेकर, अस्मिता देशपांडे, शीतल पाटील, सागर मरगाणाचे यांनी कविता सादर केल्या. कवी शिवाजी शिंदे यांनी आपल्या खुमासदार निवेदनाने रंगत आणली.

कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार लक्ष्मण सूर्यवंशी, सचिन माने, अरुण जोशी, संजय काटकर, संदीप परांजपे, अवळेकर आदींसह मोठ्या संख्येने प्राध्यापक आणि मराठी विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.

सूत्रसंचालन कु. सानिया बिळगी आणि कु. रेवती लांडगे यांनी केले तर आभार अरिफा जमादार हिने मांडले.