रायबाग : महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायबाग तालुक्यातील कृष्णा नदीच्या पात्रातील १३ गावे पाण्याखाली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर रायबागचे तहसीलदार सुरेश मुंजे यांनी कुडची येथील कृष्णा नदीच्या पाणी पातळीचे निरीक्षण केले.यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, पाण्याची पातळी वाढल्यास जनतेला कोणतीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी सर्व पूर्वतयारी करण्यात आली आहे.
रायबाग तालुक्यातील एकूण १३ गावे कृष्णा नदीच्या काठावर वसलेली आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एकूण ४० सहाय्यता केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. याशिवाय नदीकाठच्या गावांसाठी तालुकास्तरीय नोडल अधिकारी नेमण्यात आले असून नदीच्या पाणी पातळीचे दैनंदिन निरीक्षण करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना नियुक्त केले आहे.
यावेळी महसूल निरीक्षक राजू दानोळी, ग्राम लेखापाल वाय.के, ग्राम सहाय्यक जयकुमार सनदी, शिवकुमार सनदी आदि उपस्थित होते.
0 Comments