• बसव समर्थक संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 
  • उद्यानात बसवेश्वर मूर्ती प्रतिष्ठापनेची केली मागणी 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव गोवावेस येथील श्री बसवेश्वर उद्यानाचा बेंगळूरच्या धर्तीवर विकास करावा ,तसेच येथे विश्वगुरू बसवेश्वरांच्या ५० फूट उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी या मागणीठी आज शुक्रवार (दि. १९ जुलै) रोजी बसवेश्वर समर्थकविविध संघटनांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिले.

जगज्योती बसवेश्वर यांना कर्नाटकचे सांस्कृतिक नेते म्हणून घोषित करण्यात आले आहे. शासन आणि आमदारांच्या मदतीने शहरात अनेक महात्म्यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जात आहे. मात्र, शहरातील सर्वात जुन्या असलेल्या गोवावेस येथील बसवेश्वर सर्कलनजीकच्या  उद्यानातील विश्वगुरू बसवण्णांच्या पुतळ्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बसवेश्वर समर्थक संघटनांमध्ये नाराजी आहे. 

बसवेश्वर सर्कलनजीकच्या उद्यानात विश्वगुरू बसवेश्वरांच्या ५० फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. बेंगळूरच्या धर्तीवर या उद्यानाचा विकास करावा. महापालिकेच्या बैठकीत रेल्वेओव्हर ब्रिजला बसवेश्वर पूल असे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र आजतागायत या पुलाला बसवेश्वरांचे नाव देण्यात आलेले नाही. तातडीने कारवाई करावी. बेळगाव रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पांसह बसवेश्वरांचे शिल्पही बसवावे, अशी मागणी चन्नबसव फाऊंडेशनचे अध्यक्ष शंकर गुडास यांनी केली.

याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला देण्यात आले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदन स्वीकारून सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी बसवजीवी कायकयोगी संघ, चन्नबसव फाऊंडेशन, जागतिक लिंगायत महासभा, लिंगायत संघटना, हरलिया समाज, हडपद समाज आदींसह बसवेश्वर समर्थक संघटनांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.