• जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेंगळूर विधानसभा अधिवेशनादरम्यान विद्युत यंत्रमागधारक विणकरांचे वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील विणकरांनी  बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन  सुरू केले आहे. आज बेळगाव शहरात मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचलेल्या यंत्रमागधारकांनी थकबाकीचे बिल भरणार नाही, अशा घोषणा देत आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. 

शासनाने विजेच्या दरात वाढ केल्याने विजेवर चालणाऱ्या यंत्रमाग विणकरांचे जगणे असह्य झाले आहे. हेस्कॉमकडून थकीत बिलासाठी आठ ते दहा लाख रुपयांची मागणी केली जात आहे. पण विणकर याला असमर्थ आहेत. वस्त्रोद्योगमंत्र्यांनी विणकरांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांना पटवून हा मुद्दा सभागृहात मांडावा. विणकरांचे वीज बिल माफ करावे. कर्जाचा बोजा सहन न झाल्याने राज्यात आतापर्यंत ५१ विणकरांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, वस्त्रोद्योग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी काहीही केलेले नाही, अशी टीका आंदोलनकर्त्यांनी केली. 

यावेळी कर्नाटक विणकर सेवा संघाचे शिवलिंग तिरकी यांनी विणकरांच्या वीज बिल माफीवर सभागृहात चर्चा होईपर्यंत बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला. सरकारला विणकरांच्या समस्यांची चांगलीच जाण असली तरी वीज बिलाच्या वाढीचा बोजा विणकरांवर टाकला जात आहे. निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर पडला असल्याचे ते म्हणाले. एक बिल माफ करण्याचे आश्वासन देत आहे, तर दुसरा पंधरा दिवसांत बिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्याचा इशारा देत आहे. विणकरांचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हापालक मंत्र्यांनी आवाज उठवावा, अशी मागणी विणकर अर्जुन कुंभार यांनी केली. 

या आंदोलनात बेळगावसह मानकापूर, नेजा डोणेवाडी, निपाणी, बागलकोट आदी भागातील विणकर सहभागी झाले होते.